करमाळ्यात मुथा नॉलेज फाउंडेशनचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न-यश आडकरला ८० लाखांची स्कॉलरशिप

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१२: “तिमिरातून तेजाकडे” या ध्येयमंत्राला साकार रूप देत मुथा नॉलेज फाउंडेशन आणि इंटरनॅशनल विनर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ करमाळा येथील नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अबॅकसच्या विविध स्तरांतील परीक्षा तसेच हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्ड्ससारख्या कठीण स्पर्धांमध्ये सुवर्णपदक व ट्रॉफी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे यश श्रीपाद आडकर याचे यश. ए.आय. टेक्नॉलॉजिस्ट असलेल्या यशची अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे तब्बल ८० लाख रुपयांच्या स्कॉलरशिपसह निवड झाली आहे. जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या यशच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित विद्यार्थी व पालकांना नवे दिशा मिळाली. आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक संधी कशा मिळवता येतात, याबाबत त्याने मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात यशच्या यशामागील मातृशक्तीचा गौरव करत यशकल्याणी सेवाभावी संस्था यांच्या वतीने त्याच्या मातोश्रींना पहिला “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार” (मानपत्र व स्मृतीचिन्ह) देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डाॅ. गणेश करे-पाटील यांनी अबॅकस शिक्षणाचे महत्त्व सांगताना, “अबॅकस हे केवळ गणित शिकण्याचे साधन नसून बुद्धिमत्तेला धार लावणारे शास्त्र आहे. मानसिक गणित (Mental Maths) मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढवते. यामुळे मेंदूच्या दोन्ही भागांचा विकास होऊन विद्यार्थ्यांना आयुष्यात जलद व योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुनीता देवी (संचालिका, नवभारत स्कूल) आणि प्रमुख अतिथी अश्विनी देशमाने (मुख्याध्यापिका) यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पालकांनी मुलांच्या कलागुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला.
मुथा नॉलेज फाउंडेशनच्या संचालिका प्रा. ज्योती मुथा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आमचा उद्देश केवळ परीक्षा घेणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विजेता दडलेला असतो, त्याला योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर तो नक्कीच यशस्वी होतो.”
या सोहळ्यात सार्थक संजय करंडे, आरुष बनसोडे, आर्यन जाधव, खुशी शहा, यश शहा, समीक्षा थोरे, सिद्धी शिंदे, ओजस गांधी, शिवम ढवळे, सार्थक वनारसे, राजवी मोटे, श्रावणी गवळी, साद बागवान, सिद्दीक बागवान, स्वरा जाधव, देवांशी शिंदे, शंभूराजे शिंदे, आदिती खरात, ऋिषराज लष्कर, साई काळे, सई पडवळ, शरयू फरतडे, शर्वरी शिंदे, शिवराज ढवळे आणि समर्थ सूर्यवंशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या सर्व विद्यार्थ्यांना ज्योती मुथा , स्मिता वनारसे , गौरी गवळी आणि पूजा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.अशा प्रकारे मुथा नॉलेज फाउंडेशनतर्फे आयोजित हा सोहळा केवळ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम न ठरता विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा प्रेरणादायी उत्सव ठरला. या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे आणि शिक्षकवृंदाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
