२२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोथरे–कामोणे शिवरस्ता अतिक्रमणमुक्त; शेतकऱ्यांकडून तहसीलदारांचा सत्कार

करमाळा: गेल्या सुमारे बावीस वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद अवस्थेत असलेला पोथरे–कामोणे–मांगी सुमारे ७ कि.मी. लांबीचा शिवरस्ता अखेर खुला झाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मशागत, पेरणी व पीक वाहतुकीसाठी आता सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे.

पोथरे ते कामोणे शिवरस्त्याचा प्रश्न गेली २२ वर्षापासून प्रलंबित होता त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मशागत, पेरणी तसेच पीक वाहतुकीच्या वेळी रस्ता उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकवेळा पाठपुरावा करूनही शेतीसाठी रस्ता उपलब्ध होत नव्हता.

हा रस्ता जामखेड करमाळा बाजूने ३०० मीटर तर उर्वरित पोथरे-मांगी शिवरस्ता बाजूने ५०० मीटर काही शेतकऱ्यांनी अडवलेला होता. याचा हा रस्ता खुला करून द्यावा यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी रितसर अर्ज करमाळा तहसीलदार यांना केला होता. दोन सुनावणी नंतर तिसऱ्याच स्थळ पाहाणी दरम्यान तेथील शेतकऱ्यांची समजूत काढून भूमी अभिलेखेच्या नकाशाप्रमाणे तत्काळ शिव निश्चित करून शिवरस्ता खुला करण्याचा आदेश मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना आठच दिवसात हा रस्ता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी खुला करून दिला.

22 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न तहसीलदार यांनी आठ दिवसातच सोडवल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे पोथरे-कामोणे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे आभार व्यक्त करत बांधावरच त्यांचा सत्कार केला.

यावेळी मंडल अधिकारी अनिल ठाकर,ग्राम महसूल अधिकारी हर्षल शेंगळे महसूल सेवक रवी जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, शेतकरी रमेश आमटे, सरपंच अंकुश शिंदे,माजी सरपंच संगिता कांबळे, राजेंद्र लोखंडे, बापु दळवी, रविंद्र लोखंडे, सतिष भांड, गोरख लोखंडे, रामभाऊ भांड, बाळु खराडे, तानाजी खराडे, रावसाहेब शिंदे, माधव खरात,राम शिंदे, माऊली खरात, ज्ञानदेव खरात,अतुल देमुंडे,सतीश कडू, बिभिषण जाधव, शिवलिंग खरात,अनिल झिंजाडे, नितिन साळुंखे, सतीश आमटे,मिनिनाथ कराळे, प्रदीप पाटील, शिवाजी लोखंडे, नागेश खरात,इत्यादी शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक अंगद देवकते यांनी केले तर आभार रमेश आमटे यांनी मांडले.

