पळा.. पळा.. कोण पुढे पळतो!
संपादकीय
महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपा यांचे नवे सरकार कार्यरत झाले आहे. २२ जून पासून राज्यात जोरदार धावपळ सुरू होती. राज्यातील धूरंदर मंत्री आणि आमदार शिवसेना सोडून सुरतला, त्यानंतर गुवाहटीला आणि पुन्हा गोवा मार्गे महाराष्ट्रात आले. शिवसेनेतून एकदाच ३९ आमदार बाहेर पडणे त्यासोबत अपक्षांचीही गर्दी होणे हा काही योगायोग नाही. अनेक महिन्यांच्या खलबत्ताची ही परिणीती होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षा शिवसेना हा चिवट कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इतर पक्षातील लोक कधीही, कोठेही जावू शकतात, पण शिवसेनेतून असे बंड होईल ही अपेक्षा कोणालाच नव्हती. विशेष म्हणजे दस्तूरखुद्द शिवसेना पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना व त्यांचे निकटवर्तीय ना. एकनाथ शिंदे असताना ते अशाप्रकारचे बंड करू शकतात; यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पण हळूहळू सर्व चित्र राज्यात स्पष्ट झाले आणि भाजपाचा मनसुबा पूर्ण झाला.
या कालावधीत राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील व दस्तूरखुद्द मुंबईतील अनेक आमदारांनी बंडखोरी केली आहे. सुरुवातीला फक्त १२ आमदारांनी बंडखोरी केली होती. दीड दिवसात ही संख्या ३९ वर गेली आणि तीन दिवसात हा आकडा ४८ वर जावून पोहोचला व आता ५० झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं खरंच काही चुकलं होतं का ? ही बाब विचारात घेण्याजोगी आहे. कोविड कालावधीत ना. ठाकरे यांनी अतिशय उत्तम काम केले. ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास पावणेदोन वर्षेकोरोना आणि मध्येच गेले. खऱ्या अर्थाने सरकारचे कामकाज गेल्या नऊ महिन्यापासून सुरू झाले होते. या कालावधीत वेगवेगळ्या कामांची सुसंगती लावत सरकार गती घेत असतानाच बंडखोरीचा ब्रेक एवढा मोठा लागला की ठाकरे सरकारची गाडी उलटून पडली. यासाठी भाजपाने लावलेली फिल्डींग अगदी राज्यपालापासून ते ईडी पर्यंत आणि इनकम टॅक्स पासून सीबीआय पर्यंतचे मार्ग या आमदारांच्या घरापर्यंत पोहोचलेले होते. यामुळे अनेकजण त्रस्त झाले होते आणि त्यांना यातून मुक्तता मिळवण्यासाठी भाजपाचा आश्रय महत्वाचा होता.
याचमुळे ना. एकनाथ शिंदेच्या मार्गावर अनेकजण सुसाट धावले. हे लोक जेथून पुढे आले,त्या पक्षाला कठीण काळात स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून गेले आहेत. ग्रामीण भागात म्हण आहे.. ‘घुगऱ्या तिकडं उद उद’ अशी स्थिती दिसत आहे.
खरं तर राजकारण म्हटले की नेतृत्व आले. राजकारणी सत्तेतील असो वा सत्तेबाहेरील असो नेतृत्व महत्वाचे असते. नेत्यात काही गुण असतील तरच नेता समाजात असतो. नेतृत्व ही एक प्रक्रिया आहे. ज्यामुळे ठरावीक वेळेत लोकांना मार्गदर्शन करून, काम करण्यास प्रवृत्त करून एखादे काम पुर्ण करता येते. नेतृत्वाला थोडा अधिकाराचा किंवा स्वामित्वाचा आभास असावा लागतो. ज्यामुळे सदरची व्यक्ती लोकांना प्रभावित करू शकते व लोक त्यांच्या मता प्रमाणे वागतात. नेतेपणासाठी आवश्यकता असते, ती उत्तम वर्तुणुकीची व शुध्द चारित्र्याची नेत्याबद्दल अनेकांनी आपली चांगली मते व्यक्त केली आहेत. चिनी तत्त्ववेत्ता लिओ टीझ यांने नेतृत्वाची व्याख्या करताना म्हटले आहे, की नेता तेंव्हाच खूप चांगला असतो, जेंव्हा लोकांना त्याचे अस्तित्व कळते, तो बरा असतो जेंव्हा लोक त्याचे ऐकतात आणि त्याला आपला म्हणतात. तो वाईट असतो जेंव्हा लोकांचे तो ऐकत नाही, तेंव्हा लोक त्याचा तिरस्कार करतात. त्याला मान देत नाहीत. चांगला नेता कमी बोलतो, ते ही जेंव्हा त्याचे काम संपते तेव्हा !
मॅक्स डी प्रीने नेत्याबाबत म्हटले आहे, की नेत्याची पहिली जबाबदारी सर्वांना सत्य सांगणे ही असते व शेवटी आभार मानायचे असतात. मधल्या काळात तो फक्त नोकर असतो. नेते लोक त्यांच्या धैर्यासाठी व जबाबदारी स्वतःवर घेण्याच्या ताकदीसाठी, तसेच भविष्यकालीन योजनांसाठी वाखणले जातात. आजच्या नेत्यांना तर रोजच्या रोज कठीण निर्णय घेण्याच्या कामापेक्षा बऱ्याच पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यांना सामाजीक संशोधन करावे लागते, लोकांच्या कलागुणांचे संशोधन करून त्यांची क्षमता समजून घेऊन त्यांना उभे करावे लागते, तरच नेतेपणाची धुरा यशस्वीपणे पेलली जाते. राज्यशास्त्रातील या व्याख्या सध्याच्या स्थितीत कोलमडून गेल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ठाकरे हे तसे मितभाषी आहेत. संघटन कौशल्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इतके नसलेतरी आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेण्याची क्षमता त्यांच्यात चांगली आहे. खरंतर भाजपाने आपले अस्तित्व शिवसेनेच्या माध्यमातून निर्माण केले आणि याच भाजपाने शिवसेनेला अडीच वर्षासाठीही मुख्यमंत्री पद देण्याचे नाकारले. अशावेळी ठाकरे यांनी अत्यंत कणखरपणे निर्णय घेऊन भाजपाला डावलून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आणले आणि सरकारचे निर्णयही चांगले घेतले. शिवसेनेला मजबुतपणे उभे करण्यासाठी त्यांनी स्वतः पद घेण्याची इच्छा नसूनही सहकारी पक्षाच्या आग्रहास्तव पद स्विकारले. या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या पक्षासाठी नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक होते. पण व्यक्तीगत महत्वाकांक्षा व भाजपाचा उपद्रव थांबवण्यासाठी या शिवसेना आमदारांनी आपली तत्व बाजूला ठेवत नवे सरकार उभारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सर्व बाबी जुळून आल्या. भाजपाने उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव ठेवला असताना ऐनवेळी शिंदे गटाला मुख्यमंत्री पद बहाल केले आणि शिंदे गटाच्या आमदारांना खुश करून टाकले आहे. सध्याच्या स्थितीला याबाबी शिंदे गटाला किंवा भाजपाला योग्य वाटत असल्यातरी भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितच काही गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. अशाप्रकारची फुटतूट ही कोणाही पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षात चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आज समाजात चांगल्या नेत्याची उणीव आहे. सध्या संपत्ती व सत्ता आणि सत्तेचा वारसा या अभिलाषा सर्वदूर पसरल्या आहेत. नेते त्यात गुरफटून जातात आणि तेथेच त्यांच्या ऱ्हासाची बीजे रुजतात. लोक स्वातंत्र्याची भाषा बोलत असले तरी सर्व दूर नियंत्रणे लादली जातात. लोकशाहीची भाषा वापरली जाते पण एकतंत्री कारभार चालतो. निस्वार्थाचा गौरव केला जातो परंतू राजकीय लोक स्वार्थीपणाने वागतात. स्वतःला आवश्यक वाटणाऱ्या कामात ते रस घेतात व त्यामुळे समाजाच्या इच्छा- आकांक्षा धुळीला मिळतात, हे दुःख दायक आहे. हेही खरे आहे, की इतिहासातून हे लोक शहाणे होत नाहीत व धडा घेत नाहीत. आपण आपल्याभोवती अव्यवस्थेचा खंदक पुन्हा एकदा खोदत आहेत, असे चित्र दिसते. त्यामुळे सत्तेवर आलेल्या नेत्यांनी या सर्व बाबीचा विचार करून आपल्या कारकिर्दीत समाजाभिमूख निर्णय कसे होतील यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
सध्या सर्व संदर्भ बदलत चालले आहेत. राज्यातील सरकारची मुदत आणखी अडीच वर्षे आहे. म्हणजे अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर आता पुढील अडीच वर्षेविरोधकात बसावे लागणार. त्यामुळे आता काम करणाऱ्या नवीन सरकारला मदत करायची की केवळ विरोध करायचा याचा विचार करणे गरजेचे आहे. आज राजकारणात आले की सत्ता पाहिजे किंवा सत्ताधाऱ्याकडे पाहिजे कारण आपली पापे दाबली जातात. राजकारण हे केवळ देखावा झाले आहे. राजकारणातील समाजसेवा हा संपत चालला आहे. काही अपवाद आहे नाही असा नाही परंतू समाजावरील निष्ठा संपत चालली असून स्वनिष्ठा वाढत चालली आहे, हे बदलण्याची गरज आहे. वास्तविक पाहता राजकारणात ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी नामोहरण होण्याचे काही कारण नाही. राजकारणात जो टिकतो तोच यशस्वी होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे जनमाणसात या नेते मंडळीना टिकून राहिले पाहिजे. राजकारणात निवडणूकीपुरते अनेक नेते पुढे येतात, पण निवडणूकीत अपयश आले की ते जनतेपासून दूर जातात आणि त्याचा तोटा जनतेला व त्यांनाही होतो. आपल्याकडे उच्च प्रतीचे ध्येय असेलतर त्यात सातत्य असेलतर यश त्याच्या मागे धावत येत असते, अशी इतिहासात अनेक उदहारणे आहेत.
राजकारणाव्यक्तीरिक्त दुसरे उदाहरण खुप महत्वाचे आहे. प्रसिध्द चित्रकार व शिल्पकार मायकेल एंजलो हा आपल्या कामात इतका तल्लीन होत असे, की जबरदस्त पाठदुखीचा त्रास होऊनही तो अनेक दिवस व रात्री काहीही न खाता व न झोपता काम करत होता, एकदा त्याचे चित्र रंगवणे पूर्ण झाल्यानंतर त्यांने आपल्या पायातील मोजे काढले तेंव्हा, त्या मोजाबरोबर त्याच्या पायाची चामडी सोलून निघाली. योध्दा ज्यांची म्हणून ओळख आहे. असे अलेक्झांडर द ग्रेट हा तर जखमी अवस्थेत अनेकदा रणांगणात हातघाईची लढाई खेळत असे. असे हे विजेते स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या संकटाना खंबीरपणे तोंड देत होते. अनेक वेळा त्यांना अपयश येई, पण पुन्हा मागे जाऊन प्रयत्न करण्याचा ते लवचिकपणा दाखवत. जेंव्हा त्यांच्या चुका झाल्या व अपयश आले तेंव्हा त्यांनी परत सर्व गोष्टी एकत्र केल्या व प्रयत्न सुरू केले. अशी माणसे आपले जीवन ही अनुभव घेण्याची शाळा व अपयश ही यशाकडे जाण्याची, सुधारण्याची संधी समजत असत. हेही खरे जेंव्हा अडथळे येतात व माघार घ्यावी लागते, तेंव्हा खूपच निराश येते. अशा वेळी खरे विजेते परिस्थितीचा नीट आढावा घेतात व पुन्हा नव्या ताकदीने व उत्साहाने परत प्रयत्न सुरू करतात. राजकारणात सत्तेवर कोण येतो हे मतदारावर अवलंबून आहे, परंतू नेता म्हणून कसे वागायचे हे तर आपल्या हातात आहे. त्यामुळे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी सत्तेत असो अथवा विरोधात नेता म्हणून कसे वागायचे याचा विचार व्हावा हीच अपेक्षा…!
–डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०
‘आपण आपल्याभोवती अव्यवस्थेचा खंदक पुन्हा एकदा खोदत आहोत’ हे आपण नोंदविलेले निरीक्षण मनाला अतिशय भावले.