करमाळ्यातला कावळा ! - Saptahik Sandesh

करमाळ्यातला कावळा !

संपादकीय

प्रत्येक व्यक्तीला जशी स्वप्न असतात, तशी पशू-पक्षांना पण स्वप्न असतात बरं का..! असेच स्वप्नात असलेल्या कावळा व कावळीन यांची चर्चा सुरू आहे.

कावळीनीशी बोलताना म्हणाला, अगं… सखे आता पाऊस पडेल मग वर्षभर चिंता मिटली. आपल्या पिलांना चारा-पाणी कमी पडणार नाही. खरं तर आपल्याला अच्छे दिन सुरू झाले. त्यावर कावळीन म्हणाली हे ठिक आहे हो, पण आपल्याला आजून चांगले घर नाही. सरकारने घरकुलाची घोषणा केली पण आपल्याला मात्र घरकुल नाही, ज्यांना चांगली घरं आहे, त्यांनाच विशेष म्हणजे एकाच परिवारात बापाला एक, दोन पोरांना एक-एक अशी एकाच घरात तीन तीन घरकुलं पण आपल्याला एकसुध्दा नाही. तुम्हाला आठवतय का..? काय…

अहो, चिमणीचे घर पहा तीने मेणाचे पक्के घर बांधले, मागे आठवतेना आपले घर शेणाचे होते, ते पावसात वाहून गेले. आपली पिल्ले भिजू लागली म्हणून तुम्ही चिमणीकडे निवारा मागायला गेला तर तीने किती भाव खाला माहित आहे, ना.. का विसरलात..? थांब, बाळाला आंघोळ घालते, थांब बाळाला गंध लावते वैगरे वैगरे, या बाबीचा विचार करून आपण घर बांधायचे ठरवले पण अजूनसुध्दा घर बांधता आले नाही. अत्ता घर बांधायचे म्हटले तर चांगली जागा नाही. मोठ-मोठी झाडी या माणसांनी सरपणासाठी तोडली, पण कोणी एक झाड वाढवले नाही. झाडे लावण्याचे कार्यक्रम झाले, पेपरात फोटो आले पण किती झाडं वाचली, किती मोठी झाली,,? याकडे कोणाचे लक्ष आहे का..? घरासाठी दुसरी जागा घ्यायची म्हटलं तर आपली ऐपत आहे का ..? जागेच्या किमंती किती वाढल्या आहेत. त्यात आपल्या तालुक्यातलं काम म्हणजे, आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ , अशी आहे, बघा.

म्हणजे काय ग..? कावळा म्हणाला.. त्यावर कावळीन म्हणाली.. अहो मध्यंतरी पीक विमा आला. किती आला वो, आपल्याला तर काहीच नाही, आपल्या गावात एक-दोघाला आला, त्यात एक बियाची पिशवीसुध्दा येत नाही. पीक विमा उतरायचा वेळी, त्याची कागदपत्र काढताना तलाठ्यांनी किती पिळलंय माहितय ना..? त्या बँकेंवाल्यांनीतर काय ऐट मारली, जसं त्याच्या बापाचं घरचंच पैसे द्यायच्यात, त्या रूंबाबात ते पीक विम्याचा अर्ज घेत होते. आठवतोय ना..?

हो आठवतय, अन् शेवटी तो निधी आपल्या सारख्या गरीबाला मिळालाच नाही. सरकारनं कर्ज माफ केलं पण ते सुध्दा आपल्या वाट्याला आलं नाही. मोठ-मोठ्यांचीच कर्ज माफ होतील पण आपलं काय..?, पण सोसायटी न घेताही सेक्रेटरीच्या अवकृपेवरून आपल्या डोमल्यावर न घेतलेलं कर्ज अजूनही पडून आहे, त्यामुळे पुढे कर्ज नाही अन् आपली प्रगती नाही. कावळीन मोठ्या फटकाऱ्यात बोलत होती. ती पुढे म्हणाली अहो, आपल्या पिलांना प्राथमिक शाळा चांगल्या पण पुढे माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक , महाविद्यालयीन, तंत्रज्ञान शिक्षणाला घालायचे म्हटले तर या तालुक्यात चांगले शाळा-कॉलेज तरी आहे का..? पिलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे म्हटलेतर आपल्याकडे तेवढी ऐपत नाही, अन् जर इथंच आपली पिल शिकली तर त्यांना रोजगार मिळण्याची कोणतीच हमी नाही. इथे ना मोठा उद्योग ना एम. आय. डी. सी. सुरू.. अहो ऐकताय ऽ ना.. तुम्हाला आठवतं का तुमची मावशी आजारी पडली तर वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यांना बार्शीला चालवले तर त्या वाटेतच गचकल्या. सांगा कोण आपल्यासाठी काय करतय..? सत्ता मिळण्यासाठी जो तो मोठ-मोठी अश्वासने देतो पण नंतर त्यांना आपल्या सारख्या गरीबाकडे लक्ष द्यायला आजीबात वेळ मिळत नाही. पोराचा जातीचा दाखला काढायचा म्हटलंतर मामलेदार कचेरीत किती फेऱ्या मारायच्या..? एक दाखला, उतारा काढायचा म्हटलं की रेकॉर्डरूमात शंभर रूपये, कशालाही दसपट पैसे मोजावे लागतात..

आवं परवा तुमची बहीण सांगत होत्या. त्यांच्या शेजाऱ्यांनी जमीनीत ट्रॅक्टरनी बांध रेटला. त्याला विचारणा केली तर त्या शेजाऱ्यांनीच त्यांना मारहाण केली. पोलीसात तक्रार दिली तर पोलीस तक्रार लिहून घेईना, उलट त्या शेजाऱ्यांनी खोटी तक्रार दिली तर पोलीसांनी बहिणीच्या मालकावरच प्रतिबंधक कारवाई केली. बाहेर सुटायला दोन हजार रूपये गेले, आता बोला. कसं जगावं. सांगा ना..? गेल्यावर्षी उजनी शंभर टक्क्याच्यावर भरलं होतं पण बोगद्यात अन् नदीत पाणी सोडून उजनी पार रिकामी केली पण कोणीच काही बोललं नाही, मांगी तलावात कुकडीचं पाणी आलं नाही आन् जे होतं ते सोडलं नाही, वीजेला दाब मिळत नाही, त्यातून बी कसं बसं चालायचं तर नेमक्या मोक्याला थकबाकीसाठी वीजेवाले डीपीच सोडवत्यात..बोबंला.. आहे ती पीकं मार खात्यात.. कसं जगावं सांगा?

आता मात्र कावळा चिंताग्रस्त झाला. तो म्हणाला तू म्हणतेय ते सगळं खरंय ग.. पण आपल्या हातात काय आहे..? त्यावर कावळीन म्हणाली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेंव्हा आपलीच माणसं आपल्यावर घाव घालतात ती…. कावळा म्हणाला.. हे बघ असं कोड्यात काही बोलू नको.. मला नीट समजेल असे सांग.. अहो या तालुक्याच्या राजकारणात मोठी गोम आहे. इथं प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला मोठा पुढारी समजतो. आपल्या सोयीनुसार गट बदलतो आणि आपल्याला गोड बोलून निवडणूकीत मतं घेतो. कोण कुठ जातोय, कुणाची कुठ युती होतीय, कोण पक्ष बदलतोय, कोण जाहीर अश्वासन देतोय अन् पुन्हा विसरतोय, अहो इथं काहीच खरं नाही. कुणाचा कुणाला पायपोस नाही. एकदा सर्व मिळून मतं मागायला येत्यात अन् निवडणूका झाल्या की लगेच गट बदलत्यात, दुसऱ्या निवडणूकीला दुसऱ्यांचीच युती. पालिकेला एक युती, झेड पी, पंचायत समितीला दुसरी युती तर आदिनाथला पुन्हा स्वतंत्र लढत्यात. इथं जमलं तसं स्वार्थाच राजकारण चालतं. जमलं तर ठीक, नाहीत पुन्हा नवा डाव.. आपलीच माणसं आसं वागत्यात की या राजकाराची किळस वाटायला लागली. कावळा म्हणाला त्याचे कशाला तू वाईट वाटून घेते, याला तर राजकारण म्हणातात. कावळीन म्हणाली ते राजकारण नंतर पण जेंव्हा आपण एखाद्या आपल्या माणसावर विश्वास ठेवतो, तो सांगेल त्याचा प्रचार करतो, मतदान करतो, अन् तोच सहा महिन्यात ज्याच्या विरूध्द प्रचार केला तिथं जातो.. अन् आपला विश्वास घात करतो, हे बरोबर आहे का..?

असे म्हणून कावळीन म्हणाली थांबा तुम्हाला तसं नाही कळायचं एक गोष्ट सांगते. एका गावात एक सोनाराचं दुकान व एक लोहाराचं दुकान समोरासमोर होते. लोहाराच्या दुकानात लोखंडाच्या वस्तू बनवताना ते तापवून त्यावर मोठ्या हातोड्याने ठोके टाकले जायचे व त्याचा मोठा आवाज व्हायचा, तर सोनाराच्या दुकानातही सोने तापवले जायचे व त्यावर हातोड्याचे घाव बसायचे पण त्याचा आवाज मात्र खूपच लहान असायचा. एक दिवस सोनाराच्या दुकानातील सोन्याचा तुकडा उडाला व तो लोहाराच्या दुकानपुढे जावून पडला. तिथे त्याला लोखंडचा तुकडा भेटला, त्या दोघांचा संवाद सुरू झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या व बोलता बोलता सोन्याचा तुकडा म्हणाला.. भाऊ तुझं अन् माझं सारखं काम आहे यार.. या विस्तवात अंग भाजून घ्यायचं अन् मग वर पुन्हा मोठ-मोठे घनाचे घाव सहन करायचे. हो ना यार काय करणार, ही तर परंपराच आहे, असे लोखंडाचा तुकडा म्हणाला. त्यानंतर सोन्याचा तुकडा म्हणाला पण भाऊ तुझ्यावर ठोके बसतात तेंव्हा तुझा खुप मोठा आवाज होतो, पण माझा तसा मोठा आवाज होत नाही, असे का..?. लोखंड म्हणाले भाऊ त्याचे गणीत वेगळे आहे. तुझ्यावर जेंव्हा लोखंडाचा हातोडा ठोके घालतो तेंव्हा तुझा व त्याचा नातेसंबध नसतो, पण माझ्यावर जेंव्हा लोखंडाचा हातोडा ठोके टाकतो तेंव्हा तो व मी भाऊबंध असतो. अरे दुसऱ्यांनी ठोके टाकलेतर फार वाईट वाटत नसते पण जेंव्हा आपलाच माणूस आपल्यावर ठोके टाकतो ना तेंव्हा त्याचे दुःख मोठे असते. त्यामुळे माझा मोठा आवाज येतो… कावळीनीची कथा ऐकली व कावळा सुन्न झाला पण दुसऱ्याच क्षणाला म्हणाला अगं सखे.. तुझं खरंय पण मी म्हणतोय ते सुध्दा खरंय. आता या राजकर्त्यांचे सोड, आपण जरा मेहनत करू, पाऊस पडणार आहे, धीर सोडून चालणार नाही. आपले घर होईल, शेतीत चांगली पीकं काढू, बाजारात ज्याला भाव ते पीक जे विकते ते पीक लावू. आपण निर्व्यसनी आहोत, फालतू खर्च वाचवू, आणि जगाला कोणतेही प्रदर्शन नाही .. होत असते प्रगती.. चिंता करू नको.. बदलेल, सर्व काही सुरळीत होईल.. चल लागू कामाला… हळू हळू पक्षांनासुध्दा खूप कळतयंना.. पहा माणसालासुध्दा हे कळलं पाहिजे.

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!