श्रीराम प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी पुर्ण ; १० मे रोजी ३१ जोडप्यांचा विवाह होणार -

श्रीराम प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी पुर्ण ; १० मे रोजी ३१ जोडप्यांचा विवाह होणार

0


करमाळा : (संदेश प्रतिनिधी) : गरजू कुटुंबांना आधार देत समाजात एकोप्याचा संदेश देणारा ‘श्रीराम प्रतिष्ठानचा’ सामुदायिक विवाह सोहळा यंदाही उत्साहात पार पडणार आहे. येत्या १० मे रोजी ‘चांदगुडे प्लॉट’ बायपास करमाळा येथे ३१ सर्वधर्मीय वधू-वरांचा विवाह संपन्न होणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.


हा विवाह सोहळा केवळ एक समारंभ नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट घेऊन येणारा सामाजिक उपक्रम ठरत आहे. या विवाहामध्ये वधू-वरांसाठी सर्व आवश्यक साहित्याची सोय करण्यात येते. भांडीसेट, वधू-वरांचे कपडे, बूट-चप्पल, नवरदेवासाठी फेटा व शाल, नवरीसाठी साडी, मंडोळ्या, मंगळसूत्र, जोडवी, बिचवे तसेच हार-फुले, गजरे, मेकअप किट यांसह सर्व व्यवस्था करण्यात येते. याशिवाय मिरवणूक, वार्‍हांडीचे भोजन, मंडप, डेकोरेशन आणि मानाची शिदोरी अशी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
नोंदणीसाठी केवळ एक हजार रुपयांत वधू-वरांची नोंदणी केली जाते. समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत असून, यंदा या सोहळ्याचे चौथे  वर्ष आहे. सन २०२३ मध्ये २१, २०२४ मध्ये ३१ आणि २०२५ मध्ये २७ असे एकूण ७९ विवाह पार पडले असून यंदाच्या ३१ विवाहांसह हा आकडा ११० वर पोहोचणार आहे.


या सोहळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईकनिंबाळकर यांच्यासह विविध आमदार व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, काकासाहेब सरडे, जगदीश अग्रवाल, राजूकाका शीयाळ, संजयअण्णा घोरपडे, विलास आबा जाधव, भीष्माचार्य चांदणे, बाळासाहेब गोरे गुरुजी, उद्योगपती राजूकाका शियाळ,अमोल पवार, नितीन झिंजाडे, मोहन शिंदे, संतोष कुलकर्णी, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, बंडू शिंदे, दादा देवकर, जयंत काळे पाटील, दिनेश मडके, नितीन निकम, सचिन भणगे, प्रमोद फंड, बाबा घोडके, स्वानंद वांगडे, हर्षद गाडे, संजय दुर्गुळे, राजेश पाटील, वसिम सय्यद, अशोक मोरे, संदीप काळे, गणेश गोसावी, विनोदी इंदलकर, भरत गुंड, संदीप रेगुडे , महेश दिवाण, प्रसाद कोकीळ, शैलेश राजमाने ,महादेव गोसावी,तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक  कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


समाजातील प्रत्येक वधू-वराने आनंदाने संसाराची सुरुवात करावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असून श्रीराम प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता हा सोहळा स्वतःच्या घरचा समारंभ समजून कार्यरत आहे.

“सामुदायिक विवाह हा केवळ लग्न सोहळा नसून गरजू कुटुंबांना आधार देणारा आणि समाजात एकोप्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. समाजातील सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा दरवर्षी अधिक मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. प्रत्येक वधू-वराने आनंदाने संसाराची सुरुवात करावी, हीच श्रीराम प्रतिष्ठानची भावना आहे.”
– गणेश चिवटे, अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!