राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत केमच्या रेवती तळेकरचे यश; देशात पटकावला तिसरा क्रमांक

केम (संजय जाधव) : राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत केम येथील रेवती तळेकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रेवतीने या स्पर्धेत देशभरातून तिसरा क्रमांक पटकावत केम शहरासह आपल्या क्लासचे नाव उज्ज्वल केले.
दि. १२ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रेवतीने अवघ्या आठ मिनिटांत १५० पैकी १३५ गणिते अचूकपणे सोडवत आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सातारा येथे उत्साहात पार पडला. यावेळी ‘स्मार्टस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक डॉ. नरेंद्र शेलार आणि स्मिता शेलार यांच्या हस्ते रेवतीला राष्ट्रीय स्तरावरील ट्रॉफी व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रेवतीच्या या यशामध्ये केम येथील स्मार्टअस अबॅकस क्लास (केम सेंटर)च्या संस्थापिका सोनल गौरव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रियंका ओहोळ यांचे सहकार्य आणि पालकांचे प्रोत्साहनही तिच्या यशासाठी महत्त्वाचे ठरले.
रेवतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केम परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


