केम परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; आंबा व कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान

0

केम(संजय जाधव): केम(ता. करमाळा) येथील पठाराच्या शिवारात बुधवारी (दि. २२ एप्रिल) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आंबा व उन्हाळी कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि भोगेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर हा पाऊस पठाराच्या शिवारात गारपिटीसह कोसळला. वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात खाली पडून नुकसान झाले, तर उन्हाळी कांदा पिकेही भुईसपाट झाली.

आंबा बागेचे लाखोंचे नुकसान

या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरेश्वर सावतीराम तळेकर यांच्या दीड एकर आंबा बागेचे सुमारे ७ लाख रुपये, केमेश्वर सुरवसे यांच्या दीड एकर बागेचे अंदाजे ७ लाख रुपये, तसेच पांडुरंग जाधव यांच्या एक एकर आंबा बागेचे सुमारे ६ लाख रुपये नुकसान झाले. याशिवाय बिभीषण तळेकर यांच्या आंबा बागेलाही फटका बसला.

उन्हाळी कांदा पिकांचेही मोठे नुकसान

उन्हाळी कांदा पिकांचेही मोठे नुकसान झाले असून केमेश्वर सुरवसे यांच्या दीड एकर कांद्याचे अंदाजे ६ लाख रुपये, संजय जाधव यांच्या एक एकर कांद्याचे सुमारे २ लाख रुपये, संतोष तळेकर यांच्या दीड एकर कांद्याचे ४ लाख रुपये, उत्तरेश्वर बिचितकर यांच्या दीड एकर कांद्याचे ५ लाख रुपये, तर भैरू बिचितकर यांच्या एक एकर कांद्याचे सुमारे ३ लाख रुपये नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कृषी अधिकारी चौधरी व तलाठी आदलिंगे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली; मात्र पंचनाम्याचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.

तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला
“आंब्याची बाग पोटच्या मुलाप्रमाणे जपली. घरच्या खर्चात काटकसर केली, पण बागेसाठी कधी कमी पडू दिले नाही. यंदा बाग चांगली आली होती; सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र गारपिटीने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शासनाने आम्हा शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,” अशी भावना आंबा उत्पादक शेतकरी मुक्ताबाई नामदेव सुरवसे (रा. केम) यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!