NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ करमाळ्यात संतप्त आंदोलन

करमाळा : देशभरात सातत्याने घडणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत, नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांप्रती केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ करमाळा येथे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अमोल दुरंदे आणि ॲड. सविता शिंदे यांनी केले. आंदोलकांनी सांगितले की, सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने केलेल्या कथित वागणुकीचाही यावेळी निषेध करण्यात आला.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात डॉ.जयंत कापडी, औदुंबर राजेभोसले, मानसिंग खंडागळे, अंगद देवकाते, आबासाहेब टापरे, डॉ. अशोक शेळके, स्वप्निल जाधव, शंकर कुलकर्णी, डॉ. सुजीत शिंदे, ॲड. कोमल गोरे, ॲड. स्वाती सपकाळ तसेच करमाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

