कै.बाबुराव (तात्या)गायकवाड प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम; वारकऱ्यांना तब्बल १७,६४३ बिस्किट पुड्यांचे वाटप..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान, करमाळा यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बिस्किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एकूण १७,६४३ बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. करमाळा शहरात वारकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बिस्किट वाटप करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील एक महत्त्वाची परंपरा असून, लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला. करमाळा शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांपर्यंत बिस्किटांचे पुडे पोहोचविण्यात आले.

प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड यांनी सांगितले की, पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे. वारकऱ्यांना जी काही मदत करता येईल, त्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. कै.बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. शहरातील मोकाट जनावरांसाठी अन्न, चारा व पाण्याची व्यवस्था करणे, निराधार व गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, अन्नदानाचे उपक्रम राबविणे तसेच विविध सामाजिक सेवांमधून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या या भव्य बिस्किट वाटप उपक्रमाचे नागरिक, वारकरी आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कौतुक केले असून, सामाजिक सेवेतून समाजात सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!