१३७ पाणवठ्यांचा तहानलेल्या पक्ष्यांना दिलासा – तीव्र उन्हाळ्यात अखंडित सुरू होते पक्षी वाचवा अभियान

करमाळा(दि.१०):यशकल्याणी नेचर काँझर्वेशन सोसायटी, करमाळा, माळढोक अभयारण्य वन्यजीव विभाग कार्यालय, करमाळा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना तसेच यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, यांच्या सहकार्याने दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज आयोजित “पक्षी वाचवा अभियान” अंतर्गत पक्ष्यांसाठी पाणवठा उपक्रम स्पर्धा राबविण्यात आली.
महाराष्ट्र दिन ते जागतिक पर्यावरण दिन (१ मे ते ५ जून) या कालावधी मध्ये आयोजित केलेल्या या उपक्रमाला निसर्गप्रेमी , विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेचर काँझर्वेशनचे पक्षी निरीक्षक कल्याणराव साळुंके यांनी निसर्गप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहकार्याने उन्हाळी सुट्टीच्या संपूर्ण कालावधीत हे अभियान राबवले.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ, शेतात आणि परिसरात विविध प्रकारचे वन्यजीवस्नेही पाणवठे तयार केले.
पाणवठा स्पर्धेत विजेत्यांना प्रोत्साहन म्हणून प्रायोजित बक्षिसे व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यशकल्याणी संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

असा तयार केला पाणवठा-
पाणवठा तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागेच्या उपलब्धतेनूसार आपल्या शेतात, घराजवळ ५ फुट रुंद ५ फुट लांब आणि १ फुट खोलीचा समतल खड्डा खोदला
• त्यावर पाणीरोधक ताडपत्री अंथरली
• ताडपत्रीवर खड्डयाच्या मध्यभागी मोठे दगड व बाजूने लहान दगड व खडी टाकून घेतली
• पक्ष्यांना सहज पाण्यात प्रवेश करणे सोयीचे होईल इतकी खोली ठेवत तो खड्डा दगड आणि खडीने झाकून घेतला. त्या मध्ये पाणी भरून घेतले
• उष्णतेमुळे पाणी पातळी कमी होते म्हणून दररोज एक वेळ पाण्याची भर घालत पाणी पातळी कायम ठेवली
• काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी मातीची भांडी, लहान मडकी तसेच टाकाऊ साहित्य आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून आकर्षक व उपयुक्त पाणवठे उभारले.
• दररोज पाण्याची उपलब्धता करून तिथे येणाऱ्या पक्ष्यांची निरीक्षणे नोंदवली.
पाणवठ्याची उद्दिष्टे
पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक संवेदनशीलता निर्माण करणे, जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे आणि प्रत्यक्ष कृतीतून निसर्गसंवर्धनाची शिकवण देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उपक्रमांतर्गत तयार केलेल्या पाणवठ्यांचे व्हिडिओ, छायाचित्रांच्या आधारे आणि अचानक प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट पाणवठा तयार करून यशस्वी अमलबजावणी करणाऱ्या विद्यार्थ्यांस नियोजित समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांसाठी बक्षिसे प्रायोजित करण्यात येणार आहेत.

“पक्षी संवर्धन उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दाखविलेली पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत कौतुकास्पद आहे. पालकांनीही मुलांच्या उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देत घराघरांत पाणवठे उभारून मोलाचे सहकार्य केले. शिक्षणासोबत सामाजिक व पर्यावरणीय मूल्यांची जपणूक करणारा हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करते.”
– रश्मी बागल,शिक्षण संस्था सचिव तथा सोलापूर जिल्हा परिषद गटनेत्या
“पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही पर्यावरण संवर्धनाची अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील कृती आहे. यशकल्याणी नेचर काँझर्वेशन सोसायटीने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना जोडून समाजात पर्यावरणाबद्दल सकारात्मक जागृती निर्माण केली आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये निसर्गप्रेम, जबाबदारीची भावना आणि जीवसृष्टीविषयी करुणा विकसित होते. वाढत्या उष्णतेच्या काळात पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी म्हणजे त्यांना दिलेले जीवनदानच आहे. या उपक्रमातून समाजाने पर्यावरण संरक्षणासाठी कृतीशील सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.”
– डॉ. गणेश करे-पाटील,अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा जिल्हा सोलापूर
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या कृतीशील उपक्रमात सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे निरीक्षण, अनुभव, विश्लेषण व सादरीकरण करणे आदि कौशल्ये विकसित होतात. पक्षी पाणवठा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. पक्ष्यांच्या व वन्यजीवांच्या गरजा समजल्या. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक कल्याणराव साळुंके यांच्या संकल्पनेतून विविध पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणीय मूल्य व सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.”
– हनुमंत पाटील ,मुख्याध्यापक
“तीव्र उन्हाळ्यात पक्ष्यांसमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. अशा काळात यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व दिगंबरराव बागल विद्यालय, यांचा पक्षी-पाणवठा उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, जैवविविधतेचे संवर्धन पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता विकसित होत आहे. त्याबरोबरच निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य या उपक्रमातून घडत आहे. असे उपक्रम सर्वच शाळांतून होणे गरजेचे आहे.”
– डॉ. जयंत वडतकर ,अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना
“पक्षी पाणवठा उपक्रमात सहभागी होताना पक्ष्यांप्रती असलेली आपली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजली. उन्हाळ्यात त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या जाणीवेतून मी नियमितपणे पाणवठ्यात पाणी ठेवून त्याची स्वच्छता करीत असते . पाण्यासाठी येणारे विविध पक्षी पाहण्याचा आनंद मिळाला. या प्रेरणादायी उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची भावना मनात अधिक दृढ झाली. मी इतर विद्यार्थिनींनाही अशा उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन देते .”
–श्रेया संदीप शिंदे ,विद्यार्थिनी

