श्री उत्तरेश्वर देवस्थानात नक्षत्र चंदन उटी सोहळा उत्साहात संपन्न

0

केम(संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्राच्या आगमनानिमित्त पारंपरिक नक्षत्र चंदन उटी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला.  परंपरेनुसार मृग नक्षत्राचे आगमन झाल्यादिवशी सोमवारी, दि. ८ जून रोजी मध्यरात्री १२ वाजता हा धार्मिक सोहळा पार पडला.

हिंदू धर्मपरंपरेनुसार उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेपासून भगवान महादेवाच्या शिवलिंगाचे रक्षण व्हावे आणि त्यास शीतलता प्राप्त व्हावी, या भावनेतून चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) पासून श्री उत्तरेश्वर शिवलिंगावर ताम्रपात्रातून अखंड थंड पाण्याची गळती सेवा सुरू ठेवली जाते. ही सेवा मृग नक्षत्राच्या आगमनापर्यंत अखंडितपणे चालू असते.
मृग नक्षत्राच्या दिवशी मध्यरात्री शिवलिंगास सुगंधित व शुद्ध चंदनाचा लेप लावून चंदन उटी पूजा, अर्चना, भजन, आरती आदी षोडशोपचार विधी संपन्न करण्यात आले. यानंतर अखंड गळती सेवेची सांगता करण्यात आली.



सोहळ्यानिमित्त सायंकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. मुके महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर केम येथील भजनी मंडळाने मध्यरात्रीपर्यंत भजन सेवा सादर केली. रात्री बरोबर १२ वाजता शिवलिंगास चंदन उटी लावण्याचा मुख्य विधी पार पडला.

शिवलिंगास सुगंधित व शुद्ध चंदनाचा लेप व चंदन उटी लावण्यात आली



या प्रसंगी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, सदस्य तसेच मठाधीश जयंतगिरी महाराज उपस्थित होते. त्यानंतर उत्तरेश्वर भक्त टोपे महाराज यांनी उपस्थित भाविकांना चंदन उटीचा गंध लावला. महिला व पुरुष भाविकांनी या विलोभनीय सोहळ्याचा आनंद घेतला. श्रींच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!