आषाढी एकादशीला केममध्ये मनोज जरांगे पाटील; श्रीसंत बाळू मामांच्या महाआरतीला लावणार हजेरी

0

केम | संजय जाधव:करमाळा तालुक्यातील केम येथील निमोणी मळा परिसरातील खंडोबा मंदिरात श्रीसंत बाळू मामा यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणून २५ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे श्रीसंत बाळू मामांच्या महाआरतीस उपस्थित राहणार असून, त्यांच्यासमवेत आमदार नारायण पाटीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

श्रीसंत बाळू मामा पालखी क्रमांक १ चे आगमन २५ जुलै रोजी होणार आहे. पहाटे श्रींचा अभिषेक, सकाळी ९ वाजता महाआरती होईल. या महाआरतीस मनोज जरांगे पाटील प्रमुख उपस्थित राहतील. आरतीनंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर श्री बाळू मामा बिरूदेव वाळूंग मंडळ (ता. वाळवा), शिलिंग बिरूदेव ओवी मंडळ (पेठ नाका), शाहीर कृष्णात येडगे, संजय जानकर व सहकारी यांचे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. वैष्णवीताई महाराज (महानूर-ठेंगल, हंगेवाडी) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. रात्री ९ वाजता श्रींची आरती व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

शनिवार, २६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता केम गावातून भव्य अंबील, घागरी, घोडा व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

या धार्मिक सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ केम व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!