करमाळा पोलिसांची मोठी कारवाई- १०.५२ लाखांचा गांजा व पजेरो स्पोर्ट कार जप्त

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, दि. ३० : येथील पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत २ लाख ५२ हजार ५०० रुपये किंमतीचा १० किलो १०० ग्रॅम गांजा आणि ८ लाख रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कार असा एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री पांगरे (ता. करमाळा) हद्दीतील टेंभुर्णी-जेऊर मार्गावर पांगरे स्मशानभूमीजवळ एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचला.
यावेळी संशयित रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर) हा सिल्व्हर रंगाच्या पजेरो स्पोर्ट (एमएच-१२-केएफ-१८९१) या वाहनातून येताना आढळून आला. त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता वाहनात ठेवलेल्या पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एकूण १० किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा व वाहन असा १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत..

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.),
अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ. अंजना कृष्णा (भा.पो.से.) करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर ,. पोहेकॉ. दुष्यंत देवकरे श्री.लोहार , अलिममलिक शेख, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी गणेश शिंदे, रमेश फुगे,चेतन पवार ,चालक ज्योतीराम बारकुंड यांनी केली.
