NEET गैरव्यवहार व आंदोलकांवरील पोलिसी कारवाईचा निषेध; करमाळा वकील संघाचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा /संदेश प्रतिनिधी : देशभरात गाजत असलेल्या NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईचा करमाळा तालुका वकील संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत करमाळा वकील संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन आज (ता.23) सादर करण्यात आले.

यावेळी करमाळा वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर विषयात पारदर्शकता राखणे ही शासनाची जबाबदारी असून, परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.योगेश शिंपी तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड. कमलाकर वीर, ॲड. सविता शिंदे यांचे भाषणे झाली.

वकील संघाने आपल्या निवेदनात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संसदेत तातडीने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच NEET गैरव्यवहार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार व अन्य प्रकारचा कथित अत्याचार करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व जबाबदार व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका वकील संघाने मांडली. याशिवाय भविष्यात NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी केंद्र सरकारने सक्षम, पारदर्शक आणि प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन करमाळा तालुका वकील संघाने केले. यावेळी करमाळा वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला.

