करमाळ्यात नळातून येतेय दुर्गंधीयुक्त पाणी; खडकपुरा परिसरातील नागरिकांची तातडीच्या कारवाईची मागणी..

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी : (ता.21) : करमाळा शहरातील खडकपुरा गणपती मंदिराजवळ गटार बांधकामाचे काम सुरू असून, त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची गंभीर बाब समोर आली होती, या फुटलेल्या पाईपलाईनमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली त्यावरून सबंधित विभागाने घाण पाणी बाजूला केले परंतु गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून या पाईलपलाईन मधून अजूनही दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे, तरी तातडीने या दुषित पाण्याचा शोध घेऊन सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा या परिसरातील नागरिकांनी पालिकेत कारवाईचे निवेदन देवू असा इशारा व संताप व्यक्त केला आहे.

श्रीराम मंदिराशेजारी खोदलेला खड्डा गेल्या आठ दिवसांपासून तसाच आहे,
गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पिण्याच्या पाण्याच्या नळातून सध्या दुर्गंधीयुक्त व घाणेरडे पाणी येत असून, त्याला गटारीचा तीव्र वास येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, अतिसार, कावीळ व इतर संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. करमाळा शहरात दोन ते तीन दिवसातून एकदा पाणी येत आहे आणि त्यातूनही असे गटारीचे पाणी येत असल्याने नागरिकांची पाण्याविना अतोनात हाल होत आहेत. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने दखल घेण्याची मागणी करत गटाराचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच फुटलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

नागरिकांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ शकतो आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील. त्यामुळे नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!