कै.डॉ.शुभदा पुंडे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

करमाळा : संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कै.डॉ.शुभदा वसंतराव पुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साडे हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, ता. करमाळा येथे डॉ. वसंतराव पुंडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. पुंडे परिवाराच्या पुढाकारातून गेली सलग २३ वर्षे हा शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिका डॉ. अंजली श्रीवास्तव या होत्या, तर प्रा. डॉ. गणेश करे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी बदलत्या शिक्षणव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर करिअरच्या विविध संधी, जागतिक घडामोडी आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या अभियानांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पुंडे परिवाराने सलग २३ वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवून समाजापुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अंजली श्रीवास्तव यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळण्याचा घेतलेला निर्णय हा शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आणि अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. वसंतराव पुंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचावे, असे प्रेरणादायी आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी प्राचार्या नीलिमा पुंडे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ बापू पाटील, बाजीराव माने, हेमंत पुंडे, बाळासाहेब ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य सतीश ढवळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. प्रा. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी नीलिमा पुंडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पुंडे परिवाराचा हा उपक्रम समाजातील शैक्षणिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


