यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सोमनाथ गाडेकर यांचे निधन -

यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सोमनाथ गाडेकर यांचे निधन

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा,ता.२६:   साडे येथील यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार व  साडे हायस्कूलचे माजी…


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२६:   साडे येथील यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार व  साडे हायस्कूलचे माजी सहशिक्षक सोमनाथ (अण्णा) गाडेकर (वय-८०)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा,दोन मुली,सुन, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत त्यांनी आपल्या कुटुंबाला सक्षमपणे उभे केले. भावंडे आणि त्यांच्या मुलांना एकत्र ठेवत त्यांनी आदर्श संयुक्त कुटुंब व्यवस्थेचा वस्तुपाठ समाजासमोर उभा केला. कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये शिस्त, परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे संस्कार रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी असूनही त्यांनी कधीही आपल्या पदाचा वैयक्तिक नोकरीसाठी किंवा कोणत्याही लाभासाठी वापर केला नाही. शिक्षक म्हणून मिळालेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित भावनेने पार पाडली. बीजगणित विषयाचे ते आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय  होते. कठीण विषयही सोप्या पद्धतीने शिकविण्याची त्यांची हातोटी होती. शिक्षकी पेशाबरोबरच त्यांनी वेळेचे योग्य नियोजन करत घोंगड्या तयार करण्यापासून त्यांच्या विक्रीपर्यंतचा व्यवसाय, शेती, किराणा दुकान आदी विविध व्यवसाय स्वतः सांभाळले. श्रमाला प्रतिष्ठा देत स्वावलंबनाचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिला. ते प्रा. संतोष गाडेकर यांचे वडील तसेच साडे हायस्कूलचे सहशिक्षक सचिन गाडेकर यांचे चुलते होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!