अविवाहित मुलांच्या आईबापाच जगणं झालं कठीण!

0

समाजात काही चुका अशा असतात की, त्यांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्या चुका, पिढ्या न…

समाजात काही चुका अशा असतात की, त्यांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्या चुका, पिढ्या न पिढ्या समाजाच्या मनावर आणि जीवनावर ओरखडे ओढत राहतात. आज अनेक गावात, विशेषतः ग्रामीण भागात लग्नाच्या वयापेक्षा दहा-दहा वर्षे पुढे गेलेले असंख्य नवरदेव दिसतात. शिक्षण आहे, शेती आहे, घर आहे, आई-वडील आहेत; पण संसाराची गाडी सुरू होत नाही. यामागे केवळ वैयक्तीक कारणे नाहीत. यामागे मागच्या दोन – तीन पिढ्यांनी केलेल्या सामाजिक चुका आहेत.

एक काळ असा होता की, मुलगी जन्माला आली की घरात आनंदापेक्षा चिंता जास्त . ‘लेकीचा बाप’ हा शब्दच जणू दुःखाचे प्रतिक झाला होता. मुलगी मोठी झाली की तिच्या चिंता सुरू व्हायची. हुंडा, दागिणे, मानपान, थाटामाटाचे लग्न, नातेवाईकांचा दबाव या अनेक कुटूंबे कर्जबाजारी झाली. कित्येकांनी जमिनी विकल्या, काहींनी घर गहाण ठेवले तर काहींचे संसार उध्वस्त झाले. पण तरीही मुलीचे लग्न करून देणे हा बापाचा धर्म मानला होता आणि लग्नानंतर मुलीला सुख मिळेलच असे नव्हते. सासरी छळ, मानसिक त्रास, हुंड्याच्या नव्या मागण्या, अपमान हे अनेक महिलांच्या आयुष्याचे वास्तव होते.



कायद्याने दुसरे लग्न गुन्हा असतानाही गावोगावी दोन-दोन बायका ठेवणारे पुरुष कमी नव्हते. श्रीमंतीचा तो एक प्रकारचा मान समजला जात होता. एका घरात दोन स्त्रीयांचे आयुष्य उध्वस्त होत होते; पण समाज शांत होता. माहेरी आलेली मुलगी म्हणजे आई-वडिलांवर बोजा होता, ही समाजाची मानसिकता होती. “दिली तेव्हाच मेली.., सासरीच मरण आले तरी चालेल ; पण माहेरी राहू नकोस..!” असे सांगून अनेकजण मुलींना पुन्हा नरकात ढकलले होते. छळ सहन न झाल्याने अनेक मुलींनी आत्महत्या केल्या. त्या काळातील विहिरी, रेल्वे रूळ, डबे आणि गळफास हे या समाजाच्या निर्दयी मानसिकतेचे साक्षीदार आहेत.

यानंतर विज्ञानाने प्रगती केली. सोनोग्राफीमुळे गर्भातील बाळाचे लिंग समजू शकू लागले. विज्ञान माणसाचे जीवन वाचवण्यासाठी होते; पण समाजाने त्याचा वापर मुलींना संपवण्यासाठी केला. “मुलगी नको, मुलगाच हवा” या विकृत विचाराने हजारो नव्हे तर लाखो मुलींना जन्म घेण्याचा अधिकारच हिरावून घेतला.

त्यावेळी अनेकांना वाटले असेल.. ‘एक मुलगी कमी झाली तर काय फरक पडणार ?’ निसर्गाचा समतोल बिघडवण्याची किंमत अखेर समाजालाच मोजावी लागते. आज त्याच भयावह चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे आहे. ग्रामीण भागात आज अनेक तरुण ३५ ते ४५ वर्षाचे झाले तरी त्यांची लग्ने होत नाहीत. शेती आहे, स्वतःचे घर आहे, कष्ट करण्याची आहे; पण मुलगी मिळत नाही. कारण मुलींची संख्या कमी आहे. ज्या मुली उपलब्ध आहेत, त्यांना शेतकरी नवरा नको. नोकरदार हवा, तो ही मोठ्या शहरात राहणारा हवा. त्यांना , नोकरी, सुरक्षित वातावरण, शहरातील स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा अपेक्षित असते. हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील तरुण मागे पडत आहेत…



यातून सर्वात मोठा मानसिक ताण कोणावर येतो ? तर तो मुलांच्या आई-वडिलांवर. आईने लेकराला जन्म दिला, रात्रभर जागून वाढवले, शिकवले, संसारासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या. तीच आई आज वृध्दपकाळात मुलाच्या अस्वस्थतेची साक्षीदार आहे. लग्न होत नाही म्हणून घरात चिडचीड, वाद, नैराश्य, कधी शिवीगाळ तर कधी हात उचलण्यापर्यंत परिस्थिती जाते. आयुष्यभर मुलासाठी जगलेल्या आई-वडिलांना वृध्दपकाळात सन्मानाऐवजी अपमान मिळतो. अनेक घरांमध्ये साठ-सत्तर वर्षांची आई अजूनही तीन-तीन अविवाहित मुलांचा स्वयंपाक करते. वडील काठी टेकून चालतात; पण त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो.. ‘आमच्या नंतर या मुलांचे काय ?’ हा प्रश्न त्यांना रात्रभर झोप येऊ देत नाही. “


एकेकाळी ” मुलगा म्हातारपणाची काठी” असे म्हटले जायचे. पण आज अनेक आई वडिलांना तीच काठी ओझे वाटू लागली आहे. कारण मुलाच्या मनातील अस्वस्थता त्यांच्याच आयुष्यावर कोसळत आहे. मुले आई-वडिलांना दोष देत आहेत. हा प्रश्न फक्त एका कुटूंबाचा नाहीतर संपूर्ण समाजरचनेचा हादरवणारा प्रश्न आहे. विवाह उशीरा होणे, नैराश्य, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार, वृध्द पालकांची असुरक्षितता.. या सर्वांचे मुळ आहे घटलेल्या मुलींचे प्रमाण ! यावर केवळ सरकारचे कायदे पुरेसे नाहीत तर समाजाची मानसिकता बदलावी लागेल. मुलगा-मुलगी समान आहेत ही भावना प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. मुलींचे शिक्षण, सुरक्षितता, सन्मान आणि स्वावलंबन यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. गर्भलिंग तपासणी आणि स्त्रीभृणहत्या यावर आणखी कठोर बंधन आणले पाहिजे.

त्याचबरोबर ग्रामीण तरुणांच्या शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास आणि विवाह संदर्भातील प्रश्नांकडेही गंभीरतेने पाहावे लागेल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे.. निसर्गाशी खेळण्याची शिक्षा निसर्ग उशीर देतो, पण कठोर देतो. आज जी पिढी लग्नासाठी धडपडत आहे, ती या चुकीची दोषी नाही. दोष होता त्या विचारांचा, ज्यांनी मुलींना जन्मालाच येऊ दिले नाही. त्यांची चुक पण त्याचे प्रायश्चित्त आजच्या तरूणांना भोगावे लागत आहे. मुलांना जन्म देऊन, मोठे करून या मुलांचे कठोर शब्द आई-वडिलांना ऐकावे लागत आहे. समाजाने अजूनही या वास्तव्याकडे डोळसपणे पाहिले नाहीतर पुढच्या काही दशकात अधिक भीषण होणार.

इतिहास नेहमी एक धडा शिकवतो.. एका पिढीच्या स्वार्थी निर्णयांची शिक्षा पुढच्या पिढीला भोगावी लागते. आजचा विवाहाचा प्रश्न हे त्याचेच जिवंत उदाहरण आहे. ज्यांचे आईवडिल शेवटच्या स्टेजवर आहेत, त्यांचे भविष्य अंधःकारमय आहे. यांचा पुढे कोण स्वयंपाक करून देणार, कपडे धुणे, घर स्वच्छ करणे.. अशी एक ना अनेक कामाचे कसे करणार ? हा एक प्रश्न आणि शारिरीक भूक, मानसिक स्वास्थ्य हे प्रश्न अनुत्तरित आहेत. जगायचं कोणासाठी..? हा ही महत्वाचा प्रश्न आहे. मुलगी बिनलग्नाची कशीही राहू शकते; पण मुलगा बिनलग्नाचा राहणे कठीण असते. याच चिंतेत पालक तळमळत आहेत.

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!