ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर -

ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर

0

विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

करमाळा/संदेश प्रतिनिधी

करमाळा, दि. २६ : राज्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या, २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरता स्थगित केला आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केले असून, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी १५ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्यानंतर २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया राबवून ४ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा संपूर्ण कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने राज्यात विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR-2026) कार्यक्रम सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्याची सूचना केली होती.

या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत मतदार यादीच्या प्रारूप याद्या सध्या प्रसिद्ध करू नयेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला काही काळासाठी विराम मिळाला असून, सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या तयार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर हरकती, सूचना आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असून, त्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पुढील कार्यक्रमाला गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!