जिंती येथे रस्त्याच्या वादातून तरुणावर लोखंडी गज व कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला..

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा, दि. 12 : जिंती येथे रस्त्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून एकावर लोखंडी गज व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना 30 जून रोजी दुपारी घडली आहे. त्याचा गुन्हा ९ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे.
यात दगडू हसन मुलाणी (रा. जिंती , ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, शहिराज दिलावर मुलाणी यांनी फोन करून समेटाच्या बहाण्याने मला घरी बोलावले. तेथे पोहोचताच लोखंडी गजाने डाव्या हातावर तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने पाठीवर मारहाण करण्यात आली. त्यानंतर मी माझे घरी परतल्यानंतरही आरोपीने माझ्या घरी येऊन पुन्हा मारहाण केली आहे.
या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्रथम करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे व गंभीर दुखापत झाल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात आरोपी शहिराज दिलावर मुलाणी (रा. जिती, ता. करमाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!