
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.११: जेऊर येथील ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य तथा विश्व निर्मळ आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. हनुमंत हिरामण निर्मळ (वय- ६३)यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने जेऊरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
डॉ. निर्मळ यांनी सन १९८६ पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्य सुरू केले. गेली चार दशके त्यांनी शास्त्रशुद्ध आयुर्वेद उपचारपद्धती आणि पंचकर्म उपचारांचा सातत्याने प्रचार-प्रसार केला. विश्व निर्मळ आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटरच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करून अनेकांना नवजीवन दिले. रुग्णांप्रती आत्मीयता, सेवाभाव, संशोधनाची वृत्ती आणि आयुर्वेदावरील निष्ठा यामुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या अकस्मात निधनाने निर्मळ परिवारासह असंख्य माजी रुग्ण, हितचिंतक आणि जेऊर परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. वैभव निर्मळ व डॉ. ऋषिकेश निर्मळ यांचे ते वडील होत. तसेच डॉ. सुप्रिया वैभव निर्मळ यांचे ते सासरे, तर डॉ. कोमल आतिश बिंगे आणि डॉ. अश्विनी प्रवीण थोरे या त्यांच्या कन्या आहेत.
डॉ. हनुमंत निर्मळ यांच्या निधनाने एक सेवाभावी, अभ्यासू आणि समाजहितासाठी आयुष्य वाहिलेला आयुर्वेदाचार्य काळाच्या पडद्याआड गेला असून त्यांच्या कार्याची आठवण समाज कायम जपत राहील.
