वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर – सकाळच्या पुणे दिशेच्या थांब्यासाठीही प्रयत्न सुरू

करमाळा / संदेश प्रतिनिधी : वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाशिंबे तसेच परिसरातील प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली असून, प्रवासाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे सुयोग झोळ यांनी ही माहिती दिली.
प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि स्थानिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाल्याचे झोळ यांनी सांगितले. या पाठपुराव्यात खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिग्विजय बागल, नगरसेवक दीपक चव्हाण, संचालक गणेश झोळ, भाजप अध्यक्ष सचिन पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत साळुंके, जेऊर प्रवासी असोसिएशनचे सुहास सूर्यवंशी तसेच श्री. प्रदीप पवार यांचे सहकार्य लाभले.
तसेच सोगाव, वाशिंबे, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव आणि राजुरी येथील ग्रामपंचायती, अभिनव माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रजी पवार विद्यालय, राजेश्वर विद्यालय तसेच पत्रकार संघाचेही महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. शेकडो निवेदने, ई-मेल, दूरध्वनीद्वारे पाठपुरावा, रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे या मागणीला व्यापक पाठबळ मिळाले. अखेर रेल्वे बोर्डाने वाशिंबे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर केला.
सकाळच्या पुणे दिशेच्या थांब्यासाठीही प्रयत्न
याबाबत बोलताना सुयोग झोळ म्हणाले, “ही मागणी केवळ कागदावर मांडली नाही, तर दोन वर्षे सातत्याने प्रत्येक स्तरावर पाठपुरावा केला. अनेक अडचणी आल्या, निराशाही वाटली; मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचा या निर्णयामध्ये सिंहाचा वाटा आहे. परिसरातील ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाला.” “सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेनेही थांबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय होईल,” असा विश्वास सुयोग झोळ, वाशिंबे (ता. करमाळा) यांनी व्यक्त केला.





