करमाळा आयटीआयमध्ये आधुनिक ट्रेड सुरू करा- घनश्यामदास गांधी -

करमाळा आयटीआयमध्ये आधुनिक ट्रेड सुरू करा- घनश्यामदास गांधी

0


करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२: बदलत्या औद्योगिक युगात युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी करमाळा येथील मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आधुनिक व उद्योगाभिमुख नवीन ट्रेड मंजूर करावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्यामदास गांधी यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गांधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केवळ आठच ट्रेड उपलब्ध आहेत. मात्र बदलत्या औद्योगिक गरजा, तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेता संस्थेत अत्याधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे काळाची गरज आहे.
यासाठी इलेक्ट्रिक वाहन (EV) तंत्रज्ञान, औद्योगिक ऑटोमेशन, रोबोटिक्स, CNC मशीन ऑपरेटर, सौरऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान, संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग तसेच प्रगत वेल्डिंग व फॅब्रिकेशन यांसारखे आधुनिक ट्रेड तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या ट्रेडमुळे करमाळा तालुक्यातील युवकांना आधुनिक औद्योगिक कौशल्याचे प्रशिक्षण मिळून त्यांना स्थानिक तसेच देश-विदेशातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती घनश्यामदास गांधी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!