कल्पना मंथन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पायी दिंडी सोहळा; अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रभावी संदेश

0



करमाळा/ संदेश प्रतिनिधी : शणिशिवपूर (पोथरे) ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यादरम्यान निंभोरे येथे आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष व्ही. आर. गायकवाड यांनी वारकऱ्यांना अंधश्रद्धा, आंधळी भक्ती आणि विवेकनिष्ठ जीवनाचा प्रभावी संदेश दिला. “भक्तीमध्ये समजदारी नसेल तर ती आंधळी भक्ती बनते आणि आंधळी भक्ती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू ठरते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंभोरे गावचे सरपंच रविंद्र वळेकर होते. व्यासपीठावर दिंडीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. ॲड.डॉ.बाबूराव हिरडे, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकभाई खाटेर, अंनिसचे अनिल माने, राजेंद्र साने, संजय हंडे, राजेंद्र रणसिंग, प्राचार्य नागेश माने, एन. डी. सुरवसे, कवी प्रकाश लावंड, बाळासाहेब गोरे सर, पोथरेचे माजी सरपंच हरिभाऊ झिंजाडे, नानासाहेब पठाडे, किसन आबा झिंजाडे, लष्कर सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, अनेकजण आयुष्यातील अपयश, आजारपण किंवा आर्थिक अडचणींचे खापर ग्रह, करणी किंवा देवाच्या नाराजीवर फोडतात. मात्र वास्तवात माणसाची अधोगती ही चुकीच्या सवयी, चुकीची संगत, आळस, क्रोध, नियोजनाचा अभाव आणि कर्मापेक्षा कर्मकांडांवर अधिक विश्वास ठेवण्यामुळे होते. दिवसरात्र पूजा-पाठ करूनही अपेक्षित यश न मिळाल्यास देवालाच दोष देणे योग्य नाही. “मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव” असे कधीही होत नाही. देव माणसाची परीक्षा घेत नाही; माणसाने स्वतःची नियत शुद्ध ठेवून चांगले कर्म केले, तर खरा परमेश्वर त्या चांगल्या कार्यातच सापडतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, पायी दिंडी हा केवळ धार्मिक प्रवास नसून तो कल्पना मंथन, सर्जनशील विचारांची देवाणघेवाण आणि समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. दिंडीत सहभागी होताना निर्व्यसनी राहावे, शेती, व्यवसाय आणि सामाजिक जीवनात नवनवीन कल्पनांची पेरणी करावी. संतांनी दाखविलेला देव हा माणुसकीत, सेवाभावात आणि सत्कर्मात आहे. “स्वतःसाठी केलेल्या कामात स्वार्थ असतो, तर दुसऱ्यासाठी केलेल्या कामात देव असतो,” असे सांगत त्यांनी संतांच्या विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी विविध तथाकथित चमत्कारांची प्रात्यक्षिके सादर करून त्यामागील वैज्ञानिक कार्यकारणभाव उपस्थितांना समजावून सांगितला. त्यामुळे उपस्थित वारकऱ्यांमध्ये विवेकनिष्ठ विचारांची जागृती झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांनी केले, तर नानासाहेब पठाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!