दहिगाव योजनेचे पाणी नेरले-सालसे तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडण्याची मागणी

करमाळा : पावसाळा सुरू असला तरी नेरले, सालसे, केम परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने विहिरी, ओढे तसेच तलाव-बंधाऱ्यांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे दहिगाव योजनेचे पाणी नेरले-सालसे परिसरातील तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.

कुर्डूवाडी-करमाळा मार्गालगत साडे येथील ओढ्यावर नेरले-सालसे तलाव असून, घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावरही नेरले येथे तलाव आहे. या दोन्ही ओढ्यांवर अनेक छोटे-मोठे बंधारे आहेत. मात्र सध्या तलाव व बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
दोन्ही तलाव व बंधाऱ्यांच्या पाण्यावर वरकुटे, आळसुंदे, सालसे, नेरले, आवाटी, लोणी (ता. माढा) यांसह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या सिंचनाचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. सध्या जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी पाण्याची समस्या गंभीर होत आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून उजनी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दहिगाव योजनेचे पाणी साडे येथून सोडल्यास नेरले-सालसे तलाव भरू शकतो. तसेच निंभोरे-घोटी मार्गे पाणी सोडल्यास दुसरा तलाव व परिसरातील बंधारे भरता येतील. यामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या मागणीसंदर्भात कुकडी डावा कालवा उपविभाग, करमाळा यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. एकीकडे उजनीचे पाणी १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते परंतु उजनीच्या जवळ असणाऱ्या गावांना पाणी का मिळत नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत असून, याचा लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि पिण्याच्या पाण्यासाठी दहिगाव योजनेचे पाणी सोडावे, अशी विनंती औदुंबरराजे भोसले यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.

