नूतन जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात संघटन बळकटीसाठी काम करणार – जितेश कटारिया

करमाळा (प्रतिनिधी) :भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल नंदन प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहर व तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावीपणे काम केले जाईल, अशी भूमिका व्यक्त केली.

यावेळी बोलताना जितेश कटारिया म्हणाले, “गणेशभाऊ चिवटे यांच्यासारखा अभ्यासू, कार्यक्षम आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यात बूथस्तरापासून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”

यावेळी त्यांनी गणेश चिवटे यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आगामी काळात अधिक यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नूतन जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पक्ष संघटना विस्तारासाठी आणि कार्यकर्त्यांच्या बळकटीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या सत्कार सोहळ्यास भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नंदन प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

