शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या- तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१: शहरातील दत्त पेठ येथे शेजाऱ्यांकडून होत असलेल्या सततच्या वाद, शिवीगाळ व मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे.सौ. आशा अर्जुनसिंग परदेशी (वय 38) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अर्जुनसिंग विजयसिंग परदेशी (वय 50, व्यवसाय सुतारकाम, रा. दत्त पेठ, करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर 12 नोव्हेंबर 2025 रोजी शेजारी राहणाऱ्या मनिषा रविंद्र शिंगाडे , ओम रविंद्र शिंगाडे व समृद्धी रविंद्र शिंगाडे यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद होत होता. त्यानंतरही संबंधित तिघे वारंवार किरकोळ कारणांवरून तसेच वाहन पार्किंगच्या कारणावरून वाद घालून शिवीगाळ व दमदाटी करत होते. या प्रकारामुळे आशा परदेशी या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या.

दि. 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ओम शिंगाडे यांनी परदेशी यांच्या घरासमोरील जागेत स्कूटर लावल्याने पुन्हा वाद झाला. यावेळी मनिषा, ओम व समृद्धी शिंगाडे यांनी अर्जुनसिंग परदेशी व त्यांच्या पत्नी आशा यांच्यावर धावून जात मारहाण केली. नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

यानंतर काही वेळातच अर्जुनसिंग परदेशी हे त्यांच्या दुकानात गेले असताना, त्यांच्या नातेवाईकांनी फोन करून आशा परदेशी यांनी घरातील पॉलिश थिनर अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. नातेवाईकांनी तातडीने आग विझवून त्यांना करमाळा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्या सुमारे 65 टक्के भाजल्याचे सांगितले. उपचार सुरू असताना 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 7.15 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मनिषा रविंद्र शिंगाडे, ओम रविंद्र शिंगाडे व समृद्धी रविंद्र शिंगाडे (सर्व रा. दत्त पेठ, करमाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.


