शेतकरी नवरा नको गं बाई! - Saptahik Sandesh

शेतकरी नवरा नको गं बाई!

संपादकीय

काही दिवसापूर्वी कुंभेज येथे लग्नाच्या हळदी आदल्या रात्री लागल्या. दिवशी नवरदेव परण्या निघण्याची तयारी चालू होती अन् गोंधळ उडाला. नवरी मुलगी मुंबईची होती. ती म्हणाली “नवरा काळा आहे व नवऱ्याचे गाव खेडं आहे. मी तशी राहीन पण मला हा नवरा नको आणि हे लग्न नको !” म्हणत तिने लग्न मंडप सोडला व ती मुंबईला गेली. मागे मोठा गहजब झाला. एकंदरीत अलीकडे काही मुलींचे असेच काहीसे निर्णय होत आहेत. त्यामुळे मुलीच्या आई-वडीलांना तर त्रास होतोच पण मुलांच्या आई-वडील व नातेवाईक यांना फार त्रास होतो. कारण नसताना त्यांची बदनामी होते व दुर्दैवाने त्या मुलाचा दोष नसूनही त्याचे पुन्हा लग्न होण्यास अडचणी आहेत. काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे. आज शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न मोठा झाला आहे. (the issue of marriage of farmer children has become a big issue).

शेतकऱ्यांच्या संदर्भात अर्थशास्त्रीय भाषेत म्हटले जाते, की शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो व कर्जात मरतो. सामाजिक स्थिती पाहिल्यानंतर याची प्रचिती घडीघडीला येते. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही म्हण अलीकडे कुचकामी झाली आहे. नोकरी उत्तम वाटू लागली आहे. लग्नाच्या बाजारात शिपाई बाजी मारतो पण मोठा बागायतदार सुध्दा मागे रहातो.

गेल्या २० – २५ वर्षापूर्वी गर्भलिंग परीक्षेचे प्रमाण वाढले, त्यात जन्माला येण्यापूर्वीच अनेक मुलीचे गर्भ पोटातच नष्ट केले. दुर्दैवाने अलीकडे मुलीचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी मुलाबरोबर मुली लग्न करण्यास नकार देवू लागल्या आहेत. ‘शिपाई चालेल परंतू शेतकरी नवरा नको’ म्हणणाऱ्या मुलींची संख्या प्रचंड आहे.(The peon will work but the farmer should not be a husband) शेतकरी परिवारातील मुलेही शेतीला महत्व देत नाहीत. दिवस – दिवस बसतील पण शेतीच्या कामाकडे लक्ष देणार नाहीत. मुळातच शेतकऱ्यांच्या मुलालाच शेती आवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

बरं शेतकऱ्याच्या मुलाला तरी शेती का आवडावी..? हा सुध्दा एक प्रश्न आहे. कारण शेतीमध्ये काम करण्यासाठी पोषक वातावरण नाही. बाजारात बियाणे चांगले मिळत नाही, तेथे भेसळ वाढली आहे. पैसे देवून खत मिळत नाही, पाणी असून वीज वेळेवर मिळत नाही. इंजीन बसवावे तर ते परवडत नाही. बैलाने मेहनत करावी तर बैलाच्या किंमती भरमसाठ. चारा आणि खुराकाचे दर परवडत नाही. दूध धंद्याची तीच स्थिती आहे. तयार माल विकायला गेलो तर त्याला भाव नाही, पण माल विकून झाला की महिना – दोन महिन्यात मालाला प्रचंड भाव येतो. दुधाची स्थिती तीच आहे. दूध कमी भावात घेतले जाते. ग्राहकांना मात्र दुप्पट दराने विक्री होते. काहीतरी वेगळे करावे तर प्रयोग फसतात.

हे सर्व खरे आहे पण यापुढे शेतकऱ्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की.. जर खरंच शेतकरी व शेती काही कामाची नसेलतर बाजारात शेतकऱ्याला किंमत राहिली नसती. कोविड कालावधीत सर्व कारखाने बंद होते पण शेती कारखानदारी चालू होती. म्हणजे जगात सर्व थांबले तरी चालते पण शेतीशिवाय पर्याय नाही. पण तरीही शेतकऱ्याची स्थिती अशी का..? याचे कारण अजूनही आपण अपारंपारीक शेती करत आहोत. खरंतर आज पारंपारीक शेतीला खुप महत्व आहे. म्हणजे सेंद्रीय शेतीला पण आपण धड आधुनिक नाही आणि पारंपारीकपण नाही. खपली सेंद्रीय शेतीतील गहू शंभर रूपये किलो जातो तर साधा गहू २५ रूपये किलो विकला जातो. किती फरक आहे. रासायनिक शेतीने शेती संपली व माणसाचं जगणं निरर्थक झाले . आज शेतीमालाला मिळणाऱ्या बाजारभावामुळे निराशा आली आहे;

शेतात पिकवलेल्या तुरी तुम्ही सरळ बाजारात विकल्या तर ४५ ते ६० रूपये किलो जातात. पण जर त्या तुरीची दाळ केली तर ती ९० ते ११० रूपये जाते. या प्रक्रियेला खर्च येतो किलोला फक्त १० रूपये, पण भाव मिळतो दुप्पट. तेच केळीचे आहे. केळी बाजारात १२ ते २० रुपये किलो जातात, पण त्याच केळीचे वेफर्स बनवले तर ते चौपट भाव देऊन जातात. भूईमूग शेंगा ३० ते ४० किलो विकल्या जातात, पण त्याच शेंगा फोडल्या तर त्यातील शेंगदाणे ९० ते १०० रूपये विकले जातात आणि जर त्याच शेंगदाण्याचे लाकडी घाण्यावर तेल काढले तर ते तेल २३०-२४० रूपये किलो विकले जाते. या मधल्या प्रक्रियेला फार फार तर १०-२० टक्के खर्च येतो, पण भाव मात्र दुप्पट मिळतो. दुध बाजारात ३० ते ४० रूपये लिटर विकले जाते. त्याच दुधावर प्रक्रिया केली तर दुधाचे दही ८० ते १०० रूपये किलो तर तुप गीर गाईचे २००० रूपये किलो व म्हशीचे तुप ५०० ते ७०० रूपये किलो जाते. त्यामुळे आता शेतात काय पीकवायचे ? हे आपण ठरवले पाहिजे. शेतात जे पीकते ते नव्हेतर जे विकते ते पीकवले पाहिजे. नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला पाहिजे. ऊसाबरोबरच फळबागा वाढवल्या पाहिजे. त्याचे उत्पादन हे बाहेर ट्रान्स्पोर्ट करता येते का.., ते पाहिले पाहिजे. लिंबू कधी पाच रूपये तर कधी दीडशे रूपये विकले जाते. आंब्याची तीच स्थिती आहे. मग यासाठी कोल्ड स्टोरेज हा पर्याय आहे. कमी भावाच्या वेळी तो साठवून ठेवणे व भाव आला की तो विकणे. याबरोबरच गाईम्हैशी, शेळीपालन, कुक्कुट पालन, पॉली हाऊस, शेडनेटची शेती, ॲग्रो टुरीझम अशा नव्या संकल्पना विकसित करण्याची गरज आहे. यातून जर शेतकऱ्याला दरमहा लाखो रूपये मिळाले तर शेतकऱ्यांना का मुली मिळणार नाहीत?

एकदा महान शास्त्रज्ञ न्युटन आपल्या अभ्यासिकेत बसले होते. त्यावेळी त्यांचा सेवक आला व म्हणाला.. “साहेब एक ग्रहस्थ तुम्हाला भेटायला आले आहेत. ते खूप लांबून आले आहेत.” न्युटनने त्यांना बोलवले. तो ग्रहस्थ न्युटनला म्हणाला.. “साहेब मी आडाणी आहे. माल शहणं व्हायचय. शहणं होण्याचे रहस्य सांगा.” न्युटन म्हणाले.. ‘तुला शहाणं कशासाठी व्हायचं आहे ?’ ‘मला जीवनात यशस्वी व्हायचय.’ “असं का ! मग एक काम करायला शिक कोणतेही काम करताना मन एकाग्र करायला शिक. कामात मन सैरभैर होणार नाही, याचा विचार कर. तू जीवनात यशस्वी होशील.” थोडक्यात जीवनात यशस्वी व्हायचे असेलतर मन एका पाहिजे तसेच शेतीमध्येही काम एका पध्दतीने केलेतर शेती निश्चीत्तच फायद्याची होणार आहे. आता शेती व शेतकऱ्याचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. शेती हा दुय्यम व्यवसाय नाही तर तो प्रमुख व्यवसाय आहे; हे विसरून चालणार नाही. त्यामुळे शेतकरी तरुणांनो अजुनही वेळ गेलेली नाही. मुलींच्या मागे न लागता शेतीच्या मागे लागा, सर्व योग्य होईल !

-डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!