वटवृक्ष
आमचे वडील ( बापू ) विठ्ठल बाबू पन्हाळकर यांचा जन्म साधारण 1918 च्या दरम्यान झाला अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला गरिबीची परिस्थिती असताना देखील त्यांनी इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले परंतु लहानपणीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली आणि शेतीमध्ये कष्टाची कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. शेतामध्ये भरपूर उत्पन्न निघत असे परंतु मोठे कुटुंब असल्यामुळे अन्न ,वस्त्र ,निवारा याच फक्त गरजा पूर्ण करणे देखील मुश्किल होते . शेतामध्ये शारीरिक कष्ट खूप करावे लागत असे म्हणून त्यांच्या मोठ्या बंधूंनी वडिलांना पैलवान करण्यासाठी प्रयत्न केले. वडिलांनी अंग मेहनत करून चांगले शरीर कमावले परंतु त्यांना कुस्तीत कधीच यश मिळाले नाही. शेतातील कष्टाची कामे करण्यासाठी मात्र त्यांनी कमावलेल्या शरीराचा चांगलाच फायदा झाला. नांगरणी पेरणी ज्वारी काढणी, बांधणी , मळणी अशी कष्टाची कामे त्यांनी रात्र दिवस केली तरी त्यांना कधीच थकवा येत नसे. शरीराची मेहनत करत असल्यामुळे त्यांना रोज दूध आणि खारीक खोबरे यांचा खुराक होता. त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नसल्यामुळे शरीर अतिशय गजग्यासारखे बनले होते. साधं तंबाखूचा वास देखील त्यांना सहन होत नव्हता.
वरकुटे येथील भांडवलकर यांच्या कन्या द्वारकाशी विवाह झाला आणि त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली एक म्हणता म्हणता त्यांना तीन मुले व तीन मुली अशी सहा आपत्ते झाली. त्यांचे चार भावांचे मिळून अतिशय मोठे कुटुंब एकत्र राहत होते . घरातील सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे राहणीमानाचा दर्जा अतिशय सुमार होता . एकत्र कुटुंबात मुलाचे शिक्षण होणार नाही या कारणास्तव त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि थोरल्या मुलाला बार्शी येथे शाळेला पाठवले. दोघांनी कष्ट करून मुलांचे शिक्षण, मुलींची लग्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश मिळाले तिन्ही मुलींना चांगल्या ठिकाणी स्थळ पाहून त्यांनी त्यांचे विवाह केले व मुलांचे शिक्षण करून मुलांना चांगल्या पदावर पोहोचवण्यासाठी ते यशस्वी झाले .
असे हे आमचे पिताश्री “बापू”
बापूंना गावातील बरेच जेष्ठ मंडळी पाटील असे म्हणायचे खरंतर आमचं गरीब कुटुंब परंतु जर मला एखादी व्यक्ती म्हणाली” पाटलाचा मुलगा आहे का तू” ? तर मला ते कुचेष्टा केल्यासारखं वाटायचं कारण आमच्या घरात ना पाटीलकी ना मोठा बडेजाव सर्वसामान्य गरिब कुटुंब तरीपण ही पदवी का देत असावी हे मला आज पर्यंत देखील कळले नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे बापूंचा मनमोकळा आणि सरळ साधा स्वभाव असावा असे मला वाटते.
बापूंचे शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत झाले असले तरी त्यांना व्यावहारिक गणितामध्ये फार ज्ञान होते. पावकी ,निमकी ,आडीचकी, पाडे हे सर्व ज्ञान अवगत असल्यामुळे कोणताही हिशोब असेल तर ते अगदी क्षणाचाही विलंब न लावता सांगायचे मी मात्र वही पेन घेऊन गुणाकार करत बसायचो. गावातील लहानापासून थोरापर्यंत सर्व मंडळी बापूंची खूप चेष्टा करायची तरी बापूंनी कोणालाही कधी साधी शिवी देखील दिली नाही अनेक वेळा भावकीतील मंडळी काट्या कुऱ्हाडी घेऊन मारायला आले तरी त्यांनी शरीरयष्टी चांगली असताना देखील घराचे दार बंद करून घरात बसने पसंत केले परंतु कधीही कुणाशी वाद घातला नाही किंवा कोणावरती चाल करून गेले नाहीत .
आमचे बापू तसे नास्तिकच होते कधीही कुठल्या यात्रेला गेले नाहीत त्याच बरोबर कोणत्याही देवाला बकरा बळी दिला नाही. एकदा त्यांचे मित्र नागनाथ लोंढे आणि ते कुर्डूवाडीहून पंढरपूरला रेल्वेने गेले होते. विठोबाचे दर्शन घेतलं आणि संध्याकाळी सिनेमा पाहण्यासाठी गेले सिनेमा पाहत असताना पडद्यावरती सिनेमातील हिरो घोड्यावरती बसून धावत असताना आमच्या वडिलांना वाटले हे घोडे आपल्या अंगावर येईल म्हणून त्यांचे मित्र व ते सिनेमा अर्ध्यावरती सोडून पळून गेले . तोच त्यांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला परत कधीही थेटरला जाऊन त्यांनी सिनेमा पाहिला नाही किंवा टीव्ही वरती देखील कधी सिनेमा पाहिला नाही.
बापूंचे गावातील मित्रमंडळी बापूला अनेक वेळा फसवत असे एक प्रसंग अतिशय विनोदी आहे दगडू सावंत (अण्णा) यांच्या वाड्यामध्ये सर्व मित्रमंडळी बसले होते त्यातील उत्तम अण्णा आमच्या घरी आले आणि आईला म्हणाले “पाटलीन पाटलीन पाटलावर पार्टी बसली साखर द्या सरबत करायचा आहे” पूर्वी आमच्या घरात चहापाणी कोण घेत नव्हतं त्यामुळे रेशनच्या साखरेने मातीचा डेरा भरलेला असायचा आईने त्यातली अंदाजे एक किलो साखर उत्तम पाटलाकडे दिली. आमच्या शेतात लिंबाची बाग असल्यामुळे चार-पाच लिंबू दिली आणि उत्तम अण्णा निघून गेले सरबत केला, सर्वजन सरबत पिले बापूंना खूप आग्रह करत होते. थोड्यावेळाने बापू घरी आले आणि आई बापूवर भडकली म्हणाली “लय पाटील की सुटली तुम्हाला पार्ट्या करता इकडं साखर लिंबू मागायला माणसं पाठवता” तेव्हा बापूचे लक्षात आलं की उत्तम अण्णांनी जो सरबत पाजला तो आपल्याच घरचा होता .
मी सहावीत असताना शाळेला देणगी जमा करण्यासाठी माझे शिक्षक देशमुखे गुरुजी घरी आले गुरुजींनी बापूंना विनंती केली की “आपल्या शाळेमध्ये मुलांना रात्री अभ्यास करण्यासाठी लाईट घ्यावयाची आहे त्यासाठी आम्ही निधी जमा करत आहोत तुम्हाला पाहिजे तेवढी देणगी तुम्ही देऊ शकता ” त्या काळामध्ये घरामध्ये रोकड पैसे नसायचे त्यामुळे बरेचसे शेतकरी घरातील धान्य स्वरूपात देणगी देत बापूंनी मला अंबारात(ज्वारी ठेवण्यासाठी एक खण माळवदाचे छोटी खोली) उतरवले आणि बादलीने ज्वारी काढायला सुरुवात केली. एक बादली झाली दुसरी बादली झाली तिसरी वादली काढायच्या वेळेस गुरुजी म्हणाली “बापू आता थांबा बस झाले” अशाप्रकारे बापूकडे दातृत्वही चांगले होते. देशमुखे गुरुजी मला वर्गात नेहमी म्हणायचे “काय धनंजय अंबार भरले का ज्वारींनऺ” शेजारीपाजारी गोरगरिबांना अडीअडचणीला घरातील धान्य देऊन त्यांची चूल पेटवण्याची कार्य आमच्या वडिलांनी अनेक वेळा केले आहे. बापूंनी त्यांच्या 102 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही व्यक्तीला कधी शिवीगाळ केली नाही किंवा त्याचे वाईट चिंतले नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची उसनवारी किंवा कर्ज बापूंनी कधी घेतली नाही नेहमी म्हणायचे “अंथरूण पाहून पाय पसरावे”. 1972 च्या दुष्काळाच्या काळात बैलांसाठी चारा तगई घेतलेली होती ती फेडली नाही म्हणून घरावर जप्ती आली होती त्यावेळेस दावणीला बांधलेला खोंड विकला आणि ते कर्ज फेडून जप्ती थांबवली तेव्हापासून बापूंनी मरेपर्यंत शेतीचे उतारे कोरेच ठेवले .24 एकर शेतीवरून त्यांनी चाळीस एकर शेती 16 एकर नवीन खरेदी करून केली. आम्ही भावंडे नातू नातसुना सर्विसला असताना देखील त्यांनी आम्हाला कधीही पगार विचारला नाही, तुम्ही त्या पैशाचे काय करता हे विचारणा देखील केली नाही फक्त जास्त दिखावा करू नका साधे राहा हा सल्ला मात्र कायम देत आले. आम्ही सुट्टीला गावी आल्यानंतर बापू मात्र आम्हाला शेतमालाच्या विक्रीच्या पावत्या दाखवायचे आणि हे पैसे मी बँकेत ठेवलेत असे सांगायचे नोकरदार मुलांना देखील खूप कष्ट असतं रात्र रात्र त्यांच्या डोळ्याला झोप येत नाही तेव्हा त्यांनी कमावलेला पैसा देखील कष्टाचा आहे ही भावना ग्रामीण भागात असणाऱ्या व्यक्ती कमी असतात परंतु आमचे बापू त्यापैकी एक होय. तिन्ही सुना, नातसुना यांना त्यांनी मुलीप्रमाणे वागवले.
साधारण वयाच्या 90 व्या वर्षी बापूंचा पाय फरशीवरून घसरला आणि खुब्यामध्ये फॅक्चर झाले त्यावेळेस बार्शी येथे बुरगुटे डॉक्टरांचे हॉस्पिटलमध्ये दहा दिवस ऍडमिट होते त्या काळामध्ये बापूंना पाहुणेरावळे, गावातील मंडळी किमान शंभर ते दिडशे लोक भेटण्यास आले होते दवाखान्यातून घरी आल्यानंतर गुराखी मुलांनी देखील बापूंना गावठी कोंबड्याची अंडी खायला आणून दिली होती
बापूंना जेव्हा एकशे एक वर्ष झाली तेव्हा मी आणि आमच्या पुतण्यांनी बापूंचा वाढदिवस साजरा करायचा ठरवलं फोनवरून अनेक पाहुणेरावळ्यांना निमंत्रण दिली आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र आलो बापूंच्या सर्व मित्रमंडळीला आमंत्रण दिलं आणि त्यांच्या 101 व्या वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम केला.ह.भ. बंकट हंडाळ यांचे प्रवचन ठेवले .साधारण 400 ते 500 लोकांना जेवण घातले हा कार्यक्रम सोहळा ‘वृद्ध लोकांचा वाढदिवस’ आमच्या पंचक्रोशी मध्ये पहिलाच असावा बऱ्याच लोकांनी आमचे तोंड वरून कौतुक केले व्यक्ति मेल्यानंतर बारावा , वर्षश्राद्ध, पुण्यतिथी अशा कार्यक्रमाला अनेक जण प्रवचन कीर्तन ठेवून जेवणाच्या पंक्ती उठवतात परंतु व्यक्ती जिवंत असतानाच एक आनंद सोहळा साजरा करणे हे ग्रामीण भागामध्ये नवीनच होते बापू आणि आई यांच्यापुढे केक ठेवले केक कापले नातवाने त्यांच्या तोंडाला केक फासला असा अतिशय आनंदी कार्यक्रम झाला. असे लहानापासून थोरापर्यंत प्रिय असणारे आमचे बापू 13 जुलै 2020 सकाळी आंघोळ करून चहा बिस्कीट खाऊन कॉट वरती झोपले आणि परत उठलेच नाहीत म्हणतात ना प्राण जाताना माणसाला खूप त्रास होतो परंतु आमच्या बापूंचा प्राण जाताना कोणाताही त्रास झाला नाही कारण त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या जी स्वप्न पाहिली होती ती सर्व च्या सर्व पूर्ण झालेली असावी त्यामुळे त्यांना अतिशय शांततेत देवाज्ञा आली. मी आणि आमचे मोठे बंधू बाहेरगावी असल्यामुळे आणि लाॉक डाऊनचा कालावधी असल्यामुळे अंत्यविधीला पोहोचू शकलो नाही ती मात्र त्यांच्या मनामध्ये सल कायम राहिली असावी, आमच्या मनात देखील ती खंत कायम घरं करून राहिली. अंत्ययात्रेला कोरोनाचा कालावधी असताना देखील आमच्या शेतामध्ये जनतेचा महासागर पसरला होता. बापू तुम्ही अनंतात विलीन झाला असला तरी तुमच्या स्मृतीचा सुगंध कायम दरवळत आहे.अशा शतायुष्य लाभलेल्या बापूंच्या आज १३ जूलै रोजी “चौथ्या पुण्यस्मरणास”
माझा लाख लाख प्रणाम
“आम्ही तुमच्यामुळेच घडलो”
तुमचाच धनु
– प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर, ९४२३३०३७६८, नेरले ता. करमाळा जि सोलापूर