करमाळा पोलिसांची कारवाई : चोरीस गेलेली ६० हजारांची दुचाकी जप्त..

करमाळा : करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत आरोपीला अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान समाधान तुकाराम वाघ (वय २२, रा. वाघाचीवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (काळ्या रंगाची, क्र. एमएच ४२ पी २५८४) ही मोटारसायकल लावंड हॉस्पिटलसमोर उभी केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. यात विजय सुभाष लोंढे (वय २५, रा. बाळेवाडी, ता. करमाळा) याने सदर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रमोद यादवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


