छोट्या क्षणांत आनंद शोधा; जीवन समृद्ध होईल – गणेश शिंदे

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.२३: “छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला ज्याला अवगत होते, त्यालाच जीवनातील खरा आनंद प्राप्त होतो,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. करमाळा येथील नगरसेवक संजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आजच्या समाजात माणूस सतत इतरांशी तुलना करत राहतो आणि त्यातून स्वतःचे समाधान हरवून बसतो.“इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशी तुलना करा, स्वतःचे कौतुक करा. छोट्या गोष्टींमधून समाधान शोधले, तर जीवन अधिक आनंदी आणि परिपूर्ण होऊ शकते,” असेही त्यांनी सांगितले. करमाळ्यात होत असलेला हा कार्यक्रम आगळावेगळा असल्याचे नमूद करत, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, ज्येष्ठ पत्रकार ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, प्राचार्य मिलिंद फंड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर (काका) लावंड, नगराध्यक्ष मोहिनी सावंत, नगरसेवक दीपक चव्हाण, महादेव फंड, संदीप कांबळे, रवी जाधव, चैताली सावंत, अमोल परदेशी, जनक शेठ परदेशी, तुकाराम इंदलकर, डॉ. रविकरण जाधव, डॉ. अनुप भोसे, डॉ. अमोल गाडगे, अभय महाजन, पत्रकार विवेक येवले, दिनेश मडके, सरपंच भोजराज सुरवसे, नगरसेवक सुनील लुनिया, बंडू अडसूळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राहुल सावंत यांनी केले. सूत्रसंचालन निशांत खारगे यांनी तर आभार संदेश उबाळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ व नगरसेवक संजय (पप्पू) सावंत यांच्या वतीने सर्व उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.

नगरसेवक संजय सावंत यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर आदर्श ठेवला. पारंपरिक सत्कार साहित्य न स्वीकारता साहित्य स्वरूपात सत्कार स्वीकारला ते साहित्य नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना देणार आहेत तसेच पांजरापोळ संस्थेला २ टन हिरवा चारा देऊन सामाजिक बांधिलकी जपली, या उपक्रमाचे पांजरापोळ संस्थेचे भरत गांधी यांनी स्वागत केले. तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या मार्फत गरजू व्यक्तींना मोफत जेवण वाटप करण्यात आले, याव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचे ‘स्मार्ट कार्ड’अल्प दरात काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याचा अनेक प्रवाशांनी लाभ घेतला.
“माझ्या आवाहनाला मान देऊन ज्यांनी हार-फेट्यांच्या खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला, त्या सर्व हितचिंतकांचा मी ऋणी आहे. जनतेचे हे प्रेमच मला पुढील कार्यासाठी ऊर्जा देते.”
– संजय (पप्पू) सावंत (गटनेते, करमाळा शहर विकास आघाडी)



