विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती? - Saptahik Sandesh

विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?

मागे शिवसेनेत फुट पडली होती, त्यावेळी राज ठाकरे यांनी स्वतंत्र होवून मनसे हा पक्ष काढला. त्यावेळी शिवसेना फुटली त्याचे परिणाम मुंबईमधील कार्यकर्त्याना भोगावे लागले. अनेकांची संभ्रामवस्था झाली होती. त्यावर अवधुत गुप्ते यांनी ‘झेंडा’ हा चित्रपट काढला. त्या चित्रपटाचे टायटल साँग ‘विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती’ हे गीत खूपच
गाजले. मुंबईतील कार्यकर्त्यांची जी स्थिती झाली, त्याचे यथार्थ वर्णन या गीतात आहे. नेमकी तशीच स्थिती सध्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची झाली आहे.

यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुट आणि अलीकडे काँग्रेसमधील अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले, त्यामुळे संपुर्ण महराष्ट्रातील चित्र पूर्ण बदलले आहे.
कार्यकर्त्यांच्या समोर प्रश्न आहे.. राष्ट्रवादीतील शरद पवार की अजित पवार, शिवसेनेत उध्दव ठाकरे की सत्ताधारी एकनाथ शिंदे नेमके कोणासोबत रहायचे..? हा प्रश्न निर्माण
झाला आहे. यात काही कार्यकर्ते सत्तेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे गेले. जे अत्यंत निष्ठावान आहेत, ते शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबरोबरच आहेत.
याशिवाय एक गट असा आहे की त्यांचे दोघांशीही चांगले संबंधआहेत; त्यांची खरी गोची झाली आहे. बारामतीमध्ये साहेबांना व दादांना मानणारे बहुतांशी कार्यकर्ते आहेत, त्यांची फारच कोंडी झाली आहे. नेत्यांमधील वाद हा सत्तेसाठी, स्वार्थासाठी होतो पण निष्ठावान कार्यकर्त्यांनी करायचं काय..? हा खरा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बहुतेकांची कामे ही शासनदरबारी असतात. त्यामुळे ठराविक कामासाठी सत्तेतील प्रतिनिधीकडे जावे लागते आणि ते गेलेले सत्तेबाहेर असलेल्या नेत्यांना आवडत नाही, त्यातून गैरसमज निर्माण होतो व तिथे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य व्यक्तीची कुचंबना होते.

राज्यात हा वाद निर्माण का झाला ? याचे उत्तर म्हणजे ठाकरे यांनी भाजपाला दुखावले व त्यांना सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ घेऊन सत्ता हस्तगत केली. त्याचमुळे चिडलेल्या भाजपाने ठाकरे व शरद पवार यांना नेस्तानाबूत करण्याचे ठरवून सत्ता गेल्या दिवसापासून एक-एक डाव टाकायला सुरुवात केली होती. दुर्दैवाने ठाकरे हे सुरुवातीपासून ओव्हर कॉन्फीडन्सध्ये राहिले. एवढेच नाहीतर घडत चाललेल्या घटना त्यांनी वेळीच रोखल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत विरोधक व बाहेरील विरोधक यांचे बळ वाढले. त्याचे परिणाम सत्ता जाण्यात झाले. एक प्रयोग यशस्वी झाल्यामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार जागरूक असूनही व त्यांनी अंतर्गत बंड क्षमवण्याचा प्रयत्न करूनही त्यांना बंड क्षमवता आले नाही. त्यामुळे दोन्ही बंड यशस्वी झाली. इतकी यशस्वी झाली की आमदारकी तर वाचलीच वाचली पण सत्ताछायेखाली सत्ता पक्ष आणि चिन्ह सर्वकाही त्यांनाच मिळाले. त्यातच भाजपाकडे राज्यापासून केंद्रापर्यंतची सत्ता आणि त्या सत्तेतील तपास यंत्रणा त्यांच्याकडे असल्याने विरोधकांची जोरदार तपासणी सुरू झाली, त्यातअनेक र्जरर्जर झाले तर काहींनी छुपा पाठींबा दिला. अशा आता नित्याच्या गोष्टी घडत असल्याने मुळ पक्षावाले दिवसेंदिवस कमकुवत होत चालले आहेत. त्यांच्या सभा गाजताहेत, सभेला गर्दी जमते पण आज व्यासपीठावर असलेला माणूस उद्याच्या सभेला आपल्याबरोबर व्यासपीठावर राहीलच याची शाश्वती राहिलेली नाही.

सत्ता स्थानाबरोबरच आर्थिक नाड्या तोडलेल्या आहेत. राज्यात आणि केंद्रात सध्या भाजपाकडे सत्ता आहे. कदाचित त्यामुळेच त्यांनी सहकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका स्थगित ठेवल्या आहेत. पुन्हा एकदा अब की बार ४०० पार याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष लागलेले आहे. भाजपाकडे सत्तेचा माहोल आणि चौकशीचा समेमीरा गायब यामुळे भाजपामध्ये आयारामाची संख्या रोज वाढत आहे. सध्या आयाराम येवढे आले आहेत की ज्यांनी जीवाचं रान करून पक्ष उभा केला, पक्ष उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तन-मन-धन वेचलं तेच सध्या वाऱ्यावर पडल्यासारखे दिसत आहेत. निवडून येण्याची क्षमता ही अट घातल्यामुळे आयाराम मंडळीची चलती होणार असेच दिसत आहे. खरंतर ज्यांनी भाजप वाढवला, मोठा केला अशा निष्ठावान व्यक्तींना संधी देण्याची वेळ आली असताना वरीष्ठ पदावरील सत्ताधीश आयारामांना सांभाळण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत.

आज ते छान वाटत असलेतरी ते भविष्यात खुप वाईट ठरणार आहे, पण त्यावेळी विचार करण्याची वेळ गेलेली असेल. हे कमी की काय म्हणून भाजपाने सोबत घेतलेले शिंदे शिवसेना व अजितदादा राष्ट्रवादी यांना सध्या सत्तेत वाटा दिला, त्यांना पुन्हा निवडणुकीत जागा द्याव्या लागणार. तसे झालेतर मुळ पक्षाची स्थितीतर केवीलवाणी
होणारच पण तीन-चार पक्षाच्या प्रतिनिधीची तिकीटाची भुक कशी भागवणार..? आणि तिथे पुन्हा बंडखोरीचे अस्त्र उपासले जाणार. जे दुसऱ्याला चिंतले तेच आपल्यापर्यंत येवू शकते हे भाजपाला समजत असूनही नेमके काय चालले हे समजत नाही. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. अनेक ठिकाणी तडजोडी होणार, आपली जागा तिसऱ्याच व्यक्तीला द्यावी लागते. त्यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांच्या समोर प्रश्न राहणार तो म्हणजे

नेमका कोणता झेंडा हाती घेऊ..? एक कथा आहे. जंगलात सिंह राजा असतो. त्याला सिंहासनावरून हटवण्यासाठी कोल्हा प्रयत्न करत असतो. त्याला एक आयडीया सुचते. तो वाघाकडे जातो आणि त्याला फितवतो. ‘तु एवढा शुर असताना सिंहाला कशाला राज्यावर बसवायचे ? वाघ म्हणजे अरे सिंहाची शक्ती मोठी आहे, तो मला ऐकणार नाही.’ तेंव्हा कोल्हा म्हणतो, ‘त्याची कशाला काळजी करता. तुम्ही, मी होतो म्हणून सिंह राजा. आता त्याचा माझा काही संबध नाही. मी तर तुमच्यासोबत आहेच पण लांडगा आणि चार शिकारी कुत्री आहेतच. हं आणखी एक ऐका सिंह जेंव्हा झोपलेला असेल तेंव्हाच त्यावर हल्ला करायचा..!’ मग पहा. वाघ ही खुष झाला. सर्वांनी कटकारस्थान केले. एकाचवेळी वाघ, कोल्हा, लांडगा व काही शिकरी कुत्री सिंहावर चालून गेली. सिंह कसाबसा या सर्वांच्या तावडीतून जीव वाचवून पळून गेला. मग काय, वाघाचा राज्यभिषेक झाला. कोल्हा प्रधान झाला तर लांडगा सेनापती झाला. जंगल राज्य जोशात सुरू झाले.

सिंह काही दिवस जंगलाच्या बाहेर थांबला. त्या कालावधीत सत्तेतील प्राणी सिंहाला व त्याच्या शक्तीला विसरले होते. काही दिवसांनी सिंहाने आपल्या राज्यावर लक्ष केंद्रीत केले. एक दिवस वाघ गुहेत झोपला असताना सिंहाने हल्ला केला व एका तडाख्यात वाघ मारून टाकला. त्यानंतर सेनापती व प्रधान यांना पाठलाग करून पकडून त्यांचीही शिकार केली. त्यानंतर पुन्हा सिंह राजा झाला.

जंगलचे राज्य असो नाहीतर लोकशाही असो, आजचा सत्ताधीश उद्या रस्त्यावर येतो व रस्त्यावरचा पुन्हा सत्ताधीश होतो. सत्तेचे हे चक्र कायम फिरत असते. सत्ता चक्र काही काळ स्थिर असल्याचे जाणवते पण ते कायम अस्थिर असते. त्यामुळे सत्तेत असलेल्यांनी उतमात करू नये व सत्तेबाहेर असलेल्यांनी एकदम निराश होवू नये. हे जेवढे वास्तव आहे तेवढेच वास्तव सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे असते. त्यांना अशाप्रसंगी काय करावे हेच समजत नाही. याच्याकडे जावू की त्याच्याकडे जावू, कोणावर निष्टा ठेवू. अशावेळी आठवते अवधुत गुप्ते यांच्या ‘झेंडा’ या चित्रपटाचे टायटल साँग ‘विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?’ पण खरंतर सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ते यांना एकच सुचवावेसे वाटते.., आता तुम्ही कोणताच झेंडा हाती घेऊ नका, झेंडा काढून ठेवा व त्याचे दांडके हातात घेऊन जे चुकले त्यांना मतदानरूपी दांडके घालून त्यांच्या जागेवर बसवा बस्स..!

डॉ. अ‍ॅड. बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!