लोकसभेच्या चर्चा - दुष्काळाचा मोर्चा - Saptahik Sandesh

लोकसभेच्या चर्चा – दुष्काळाचा मोर्चा

लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, माढा मतदारसंघात भाजपा उमेदवार बदलणार का.. मोहिते-पाटील विरोधकाकडून उभे राहणार का..? लढत कशी होणार..? यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. पण मतदार संघात विशेषतः करमाळा तालुक्यात पाणी टंचाई आहे, त्यावर फारशा चर्चा होताना दिसत नाही. दस्तुरखुद्द करमाळा शहरात गेली १० दिवसापासून तीव्र पाणी टंचाई आहे. अनेकांना भाड्याने खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.
तालुक्यातील ९ गावात टँकरव्दारे पाणी सुरू आहे. आणखी १२ गावांची टँकरची मागणी आहे. यावरून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन चुकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन चुकत असेलतर शेती सिंचनाचा प्रश्न दुरच राहणार हे उघड आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला दहीगाव उपसा सिंचनचे पाणी बंद झाल्याने शेकडो एकरातील बागायती पीके जळून खाक झाली आहेत. पीकासाठी शेतकऱ्यांना उजनीतून उचल पाणी घेण्यासाठी दररोज पाईप व कनेक्शन वाढवावे लागत आहे. गावागावातील विहिरी आटल्या आहेत, बोअर शेवटच्या घटका मोजत आहेत. असे एक ना अनेकप्रकारे दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. आणखी एप्रिल, मे व निम्मा जून महिना जायचा आहे. भविष्याचे चित्र यावरून दिसून येते.
या सर्व परिस्थितीवरून हे स्पष्ट होते की, संपुर्ण करमाळा हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

मुळातच प्रशासन हे तहान लागल्यानंतर आड खोदणारे आहे.. असे म्हणणे म्हणजे कावळा काळा आहे असे म्हणण्यासारखे आहे. प्रशासनात जे कर्मचारी असतात ते ‘मोले घातले रडाया, ना आसू ना माया ।’ अशा प्रकारचे असतात. आलेला दिवस कसा जाईल, यावरच त्यांचे लक्ष असते. अपवादाने मनापासून काम करणारे फार थोडे कर्मचारी व अधिकारी असतात. शेतकरी शेती करतो, शेतात कामाला मजूर लावतो पण नियोजन स्वतः करतो व मजुराकडून कामाची अंमलबजावणी पुर्ण करतो. जो शेतकरी मजुरावर अवलंबून असतो, त्याची गत न पाहण्यासारखी होत असते.

लहानपणी पाठ्यपुस्तकात एक कथा होती. दोघे भाऊ असतात. दोघांना शेती सारखीच पण त्यातील एक मोठा शेतकरी होतो तर दुसरा त्याचा सख्खा भाऊ खायला महाग होतो. याचे कारण मोठा भाऊ मजुराच्या आगोदर शेतात जाई व मजुरापेक्षा जास्त काम करी आणि काम काय करायचे याचे नियोजन करत राही. त्यातून त्याची प्रगती झाली.
दुसरा जो होता तो मजुरांना कामाला लावी, त्यांना म्हणे ‘व्हा पुढे मी आलोच.’ कधी शेतात जात तर कधी आळसात पडून राही. त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू पीकाचे उत्पादन कमी झाले व शेती तोट्यात गेली. एकदा तोट्यात गेलेले घर व शेती फायद्यात आणणे सोपे नसते.
ज्याप्रकारे शेतकऱ्याचे तसेच तालुक्याचे गणित आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तसेच गण-गटातील प्रतिनिधींनी आपापल्या विभागात तर गावच्या सरपंचानी आपापल्या गावात योग्य नियोजन केले तर कोणताच प्रश्न उभा राहणार नाही. हिवरेबाजार सारख्या दुष्काळी भागातील गावात गावच्या नियोजनाने दुष्काळ हटला व तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सोडाच पण दुष्काळातही शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. एवढे नियोजन आपणाला होणार नाही, हे जरी खरे असलेतरी निदान गावातील लोक पाण्यासाठी भांडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. महत्वाचे म्हणजे आपणाकडे पाणी असूनही त्याचे नियोजन केले जात नाही. पाऊस कमी झाला तर हिवरेबाजारमध्ये उन्हाळ पीके घेतली जात नाहीत. तेथे फळबागा जगवल्या जातात. आपणाकडे पाऊस कमी झालातरी नदी, तलावकाठ
व बंधाऱ्याजवळचे शेतकरी ऊसाची लागवड थांबवत नाहीत. तासावर पाणी आलेतरी विहीरीचा उपसा थांबवत नाहीत. आपणाकडे पाणी आहे पण त्याचे योग्य नियोजन करत नाही. उजनीचे पाणी उणे इतके झाले की नियोजनाअभावी उणेचा सुध्दा विक्रम झाला आहे. सर्वांनीच पावसाळ्यात जागृतता दाखवली असतीतर ही वेळ आली नसती. मांगी तलवासाठी एक टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. अर्थातच त्याला अट अशी आहे जादा पाणी असेलतर..! आता जादा पाणी कधी व किती असल्यावर जादा म्हणायचे याचा मेळ नाही. (भीमा-सीना बोगदा याच तत्वावर निर्माण झाला आहे. परंतू ऐन दुष्काळातही उजनीचे पाणी या बोगद्यातून जात आहे.) त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या पाण्यावर मांगी तलाव भरण्याची अपेक्षा न करता थेट कुकडीच्या पाण्याने मांगी तलाव भरून घेतला पाहिजे. प्रत्येक वर्षी हीच भुमीका राबवली तर हा परिसर सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

हाच प्रयोग राजुरी, वीट, कोंढेज आदी तलवाबाबत
राबवला पाहिजे. सीना नदीवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथे आहेत. त्यातील पोटेगाव बंधारा हा कायम गळका आहे, त्याची दुरुस्ती केली
जात नाही. त्यामुळे हा बंधारा देखाव्याला आहे, पावसाळ्यातही त्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याची दुरुस्ती कधी करणार..? अन्य बंधाऱ्याच्या दरवाजाचा
प्रश्न आहे, बऱ्याच वेळा वेळेवर हे दरवाजे अडवले जात नाहीत व नंतर पाऊस झाला नाहीतर हे बंधारे फक्त देखाव्याला राहतात. हे प्रश्न संबधीत गावच्या प्रतिनिधींनी पुढे
होऊन सोडवला पाहिजे. वेळेवर लक्ष दिलेतर या भागातील बंधारे कार्यक्षम होतील व सिंचनक्षमता वाढणार आहे.
तलावात उजनीचे पाणी सोडण्याचा प्रयोग गेली अनेक वर्ष चर्चीला जात आहे; परंतू तो प्रयोग पुर्ण केला जात नाही, त्यामुळे उजनी परिसर जवळचा हा भाग अद्यापही उजाड
माळरान आहे. वडशिवणे उजनीचे पाणी थेट मराठवाड्यात
चालले पण ज्या करमाळा तालुक्यातील २४ गावांनी जलसमाधी घेतली त्या करमाळा तालुक्यासाठी असलेली एकमेव दहीगाव योजना पुर्ण क्षमतेने चालवली जात नाही.
गेल्या ४३ वर्षात पुनर्वसनाचे प्रश्न तसेच आहेत. केम, उमरड, रिटेवाडी उपसा सिंचन योजना अद्यापही कागदावर आहे. याशिवाय कुकडीचे पाणी आपणाला कधीच मिळत नाही
व मिळण्याची शक्यता नाही. यासाठी केवळ लोकप्रतिनिधीला दोष देवून चालणार नाहीतर संपुर्ण तालुक्याने संघटीत होऊन पाण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. दुष्काळ हा सुचक आहे, प्रत्येकाला जागा करतो, नवीन
काही करण्यासाठी सुचवतो पण आपण फक्त दुष्काळाची चर्चा करतो व त्यातच दबून जातो. संकट वरदान असतात याचा विचार करून नियोजन केले पाहिजे. एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकामुळे
घोषणाचा सुकाळ होणार आहे.

आचारसंहितेचे कारण सांगत आता पुढारी हात वर करणार
आहेत. जनावरांचा चारा, जनावरांना लागणारे पाणी शेतकरी कोठून आणणार..? शेतमजुरांच्या कामाचाही लवकरच प्रश्न उभा राहणार आहे. नेमके काय करायचे..? यापुढे दुष्काळाची वाट न पाहता, दुष्काळापुर्वी सावध झाले पाहिजे व आपली आपण सोडवणूक केली पाहिजे. ज्या त्या भागातील प्रतिनिधींनी निदान यापुढे सतर्क राहून आपापली कामे केलीतर पुढे अडचणी येणार नाहीत. सर्वांच्याच हितासाठी सर्वांनी सावध होण्याची गरज आहे !

डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!