१००% अनुदानित शाळा बंद होतेय??
आता उद्याच्या 15 जून पासून एक अनुदानित हायस्कूल बंद होत आहे… करमाळा तालुक्यात वरकुटे नावाचे एक गाव आहे. त्या गावांमध्ये सरस्वती हायस्कूल वरकुटे या नावाचे एक टुमदार हायस्कूल होते. आठवी ते दहावीचे तीन वर्ग, पाच शिक्षक आणि पाच नॉन टीचिंग स्टाफ, दोन अडीच एकराचा परिसर, एक छानशी कम्प्युटर लॅब आणि अतिशय आवडीने शिकणारे विद्यार्थी असा सगळा भाग असताना आता ती 100% अनुदानित शाळा बंद होतेय..
त्याला कारण फार मोठं आहे असं नाही. तिथले सीनियर शिक्षक एक एक करीत सेवानिवृत्त झाले. शासनाच्या शिक्षक भरती बंद या धोरणामुळे वारंवार मागणी करूनही शासनाने पुन्हा त्या जागेवर शिक्षक दिले नाहीत.. अशा पद्धतीने पाच शिक्षकी शाळा दोन शिक्षकी झाली आणि कालच्या 31 मे रोजी त्यातील एक शिक्षक पुन्हा सेवानिवृत्त झाले… आता शाळेत फक्त एक शिक्षक आणि तीन वर्ग उरलेत… कार्यरत असणारे जाधव सर तरुण आहेत. बीए बीएड आहेत, पण ते आता या तीन वर्गांना शिकवू शकणार नाहीत.. आता मुख्याध्यापकही तेच आहेत. सह शिक्षकही तेच आहेत.शाळेने मागेच केव्हातरी सरप्लस शिक्षकांची मागणी केली होती. पण सरप्लस मधले कोणी या शाळेत यायला तयार नाहीत… वरच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन हे शिक्षक इथे येण्याचे टाळतात. आड बाजूला असणाऱ्या एका खेड्यात कोण कशाला येईल.. सोलापूर जिल्ह्यात साधारणपणे 70 ते 75 शिक्षक अतिरिक्त आहेत असे समजते.. अधिकारी वर्ग फोर्सफुली सरस्वती मध्ये कोणालाही पाठवत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सरस्वती नावाची ही एकमेव शाळा आता बंद होईल यात शंका नाही. पोर्टल मधून शिक्षक मिळण्याची प्रक्रिया आता पूर्ण थांबलेली आहे. त्यामुळे तिथूनही काही नवी आशा निर्माण होईल अशी चिन्हे नाहीत….
एक 100% अनुदानित शाळा ही अशा रीतीने दुर्दैवी पद्धतीने बंद होते आहे. या शाळेबाबत संस्था उदासीन आहे. त्यामुळे आतापर्यंत शिक्षकांनीच तिथला किल्ला लढवला होता. कमी शिक्षक, तासांचा लोड जास्त त्यामुळे रात्री काही शिक्षकांना डोक्याला झंडू बाम लावून झोपायची पाळी येत होती. इतके काम तिथे होते. या शाळेच्या या असहाय्यतेचा फायदा घेऊन आजूबाजूच्या गावातील काही शाळांनी त्यांचे विद्यार्थी पळवले. पालकांनीही काळाची पावले ओळखून आपली मुले तेथून काढून दुसरीकडे घातली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या शाळेचे असे तीन तेरा झालेले बघायचे दुर्दैव इथल्या शिक्षकांच्या नशिबी आले. वाडी वस्तीवरची, गावातील गोरगरिबांची मुले इथे शिकत होती. आता त्याच मुलांना दूरवर शिक्षणासाठी पैसे खर्च करून पायपीट करावी लागत आहे ही बाब आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे ….
उद्या ही शाळा बंद झाली तर “अपुऱ्या पटामुळे शाळा बंद” असा रीमार्क शासनाच्या दप्तरी मारला जाईल ही मोठी विडंबना आहे. शासनाला नेमके काय करायचे आहे? हे अस्पष्ट आहे. शिक्षक भरती बंद ठेवून सरकार मागच्या दोन पिढ्यांच्या जीवनाशी खेळलेच आहे. आता याचा बळी या शाळा ठरत आहेत..नवीन शैक्षणिक धोरणात या गोष्टी कोठेच आल्या नाहीत. आरटीई तर पार धुळीला मिळालेला आहे… म्हणजे एकूणच आपण कुठे चाललो आहोत हे कळायला मार्ग नाही..
मला वाटते ही एकट्या सरस्वती हायस्कूलची गोष्ट नाही. अनेक हायस्कूलमध्ये खूप सारे शिक्षक कमी आहेत. निवृत्त शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक भरले गेले नाहीत. 2018 सालात मागणी केलेले शिक्षक पोर्टल मधून 2023 मध्ये दिले गेले. म्हणजे पाच ते सहा वर्ष रिकाम्या जागेवर दुसरे शिक्षक यायला वेळ लागत असेल, तर त्या शाळेचे तोपर्यंत काय होत असेल? या असल्या भानगडीमुळे पट टिकवायचा कसा? हा मोठा प्रश्न काही शाळांसमोर उभा आहे..
एकीकडे हे असे होत असताना विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुसाट आहेत.. त्यांना कमी पैशातील शिक्षक आणि जास्त फी वाले विद्यार्थी सहज उपलब्ध होतात.. मराठी आणि महाराष्ट्र याचा बसता उठता गौरव करत असताना आपल्या मराठी शाळा रसातळाला चालल्या आहेत याबद्दल कोणीही खंत व्यक्त करायला तयार नाही. नेते त्यांच्या त्यांच्या राजकारणात व्यस्त आहेत तर आपण आपल्या घरात आबाद आहोत… त्यामुळेच हळूहळू अशा असंख्य शाळा बंद पडत असताना त्याचा थोडासा सुद्धा दुःखाचा ओरखडा आपल्या मनावर पडणार नाही.. बंद पडणाऱ्या शाळांची जबाबदारी शासन, अधिकारी कधीच घेणार नाहीत…त्यामुळे आपणच वेडे आहोत असं समजून टक्क डोळ्यांनी रिटायरमेंट ची वाट बघायची इतकंच…
– भीष्माचार्य चांदणे, करमाळा, मो.9881174988
संबंधित बातमी – वरकुटे येथील अनुदानित शाळा शिक्षका अभावी बंद पडण्याची शक्यता – ३ इयत्तेसाठी एकच शिक्षक