प्रतिकूलत परिस्थितीवर मात करत अहिल्या मोहिते यांची मंत्रालयात लिपिक टंकलेखन पदावर निवड..

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता. 5 : जिद्द, कष्ट आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे वाटेफळ (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील अहिल्या बबन मोहिते यांचे आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या अहिल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले असून तिची मंत्रालयात लिपिक टंकलेखन पदावर निवड झाली आहे. अहिल्या मोहिते हिने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, वाटेफळ येथे पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात घेतले तर पुढे बी.एस्सी. चे पदवीचे शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मध्ये पूर्ण करत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. आर्थिक व कौटुंबिक अडचणींचा सामना करत तिने अभ्यासात सातत्य राखले आणि अखेर यशाला गवसणी घातली.
लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे तिच्या संगोपनाची जबाबदारी चुलते मच्छिंद्र मोहिते सर व चुलती सौ. रेखा मोहिते यांनी प्रेमाने पार पाडली. तिची आई मंगल मोहिते, चुलते-चुलती, आत्या जयश्री माने , भाऊ-बहिण यांचे सतत प्रोत्साहन महत्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांच्या लहान बाळाची जबाबदारी सांभाळत तिने अभ्यास सुरू ठेवला, ही बाब अधिक प्रेरणादायी ठरते.
तिचे पती गणेश मेकडे यांनीही तिला खंबीर साथ दिली. कुटुंबाच्या या एकजुटीमुळेच अहिल्याने कठीण परिस्थितीतही हार न मानता यश मिळवले. अहिल्या मोहिते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून तिचे कौतुक होत असून, अनेक तरुण-तरुणींना तिच्या यशातून प्रेरणा मिळत आहे. तिच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी ही खऱ्या अर्थाने “मेहनत कधीच वाया जात नाही” याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

