शरीरयष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या टर्मिन इंजेक्शनचा पर्दाफाश; करमाळ्यात मोठी कारवाई

करमाळा(दि.३१): करमाळा पोलिसांनी नशेसाठी तसेच शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टर्मिन (Mepentermine Sulphite Injection IP) इंजेक्शनच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १५० बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत सुमारे २ लाख ९ हजार १३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये इंजेक्शनसह बुलेट मोटारसायकलचाही समावेश आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मे २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास करमाळा शहरातील कर्जत रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या इंजेक्शन विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार करमाळा पोलिसांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
१५० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त
कारवाईदरम्यान Troikaa आणि Termiva या दोन कंपनीच्या Mephentermine Sulphite Injection IP या नावाच्या २० बॉक्समधील १५० बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत ४९ हजार १३३ रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकलही जप्त करण्यात आली. एकूण २ लाख ९ हजार १३३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
आरोग्यास गंभीर धोका
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इंजेक्शन हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करणे कायद्याने गुन्हा असून ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरणे आरोग्यास धोकादायक ठरू शकते. कमी रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा काही जण शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी गैरवापर करतात. यामुळे गुंगी, भ्रम, हृदयाचे ठोके मंदावणे, आकडी येणे, किडनी आणि हृदयविकारासारखे गंभीर दुष्परिणाम संभवतात.
गुन्हा दाखल; तपास सुरू
या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 278, 125, 123,3(5) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,पो.कॉ. गोसावी, पो.कॉ. दहीहंडी,पो.कॉ.रणदील,पो.कॉ. शेरखाने या पोलिस पथकाने केली.
युवकांना पोलिसांचे आवाहन
व्यायाम किंवा शरीरयष्टी सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या इंजेक्शनचा वापर करू नये, संतुलित आहार व नियमित व्यायामाद्वारे शरीर तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन करमाळा पोलिसांनी केले आहे. तसेच अशा इंजेक्शनची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

