ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. धनंजय पन्हाळकर सेवानिवृत्त -

ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. धनंजय पन्हाळकर सेवानिवृत्त

0

“गणित हा कठीण विषय नसून विचार करण्याची कला आहे,” हा संदेश गेली 33 वर्षे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणारे  गणित विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर नियत वयोमानानुसार 31 मे 2026 रोजी निवृत्त झाले आहेत. प्रा.पन्हाळकर हे करमाळा तालुक्यातील नेरले गावचे सुपुत्र असून देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती नं.शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने त्यांचा महाविद्यालयाने सन्मान केला व पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांचे यश आणि मार्गदर्शन
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी बारावी, एमएच-सीईटी तसेच जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या 33 वर्षाच्या अध्यापन कालावधीत 350 पेक्षा जास्त विद्यार्थी इंजिनियर झाले आहेत तर दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर झाली आहेत. प्रशांत मुंबरकर, सुचिता काळे या विद्यार्थ्यांना गणित या विषयांमध्ये एच एस सी बोर्ड परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण प्राप्त झाले होते. त्यांचे अनेक विद्यार्थी सध्या परदेशी स्थायिक आहेत.

देवगड मध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये सेवा करणारे डॉक्टर मनोज होगले, डॉक्टर दत्तप्रसाद सावंत, डॉक्टर दिग्विजय राणे, डॉक्टर समीर मर्गज हे मेडिकलचे टार्गेट निश्चित असताना देखील गणिताबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय प्रेमाने आवड होती त्यांनी बोर्डामध्ये गणित या विषयाला चांगली स्कोरिंग केले आहे तसेच डॉक्टर नितीन खाडिलकर डॉक्टर संदीप बोरफळकर डॉक्टर सरवणकर हे मेडिकल क्षेत्रामध्ये इतर ठिकाणी चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करत आहेत तसेच देवगड मध्ये राहुल गोगटे राकेश पेडणेकर इंजिनियर बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी देवगड तालुक्यामध्ये तसेच याच महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करून शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. “विद्यार्थी हेच दैवत” म्हणून त्यांनी ३३ वर्षांमध्ये गणित अध्यापनाचे कार्य केले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने त्यांना परीक्षक, मॉडरेटर, मुख्य मॉडरेटर तसेच प्रश्नपत्रिका निर्माते म्हणून काम करण्याची संधी दिली.सुधारित अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर विभागामध्ये पाच जिल्ह्यात रिसोर्स पर्सन म्हणून काम केले आहे. अभ्यास मंडळ सदस्य तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बालभारतीमध्ये इयत्ता अकरावी व बारावी गणित या विषयाचे पुस्तक लेखनामध्ये काम केले आहे.

पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि लेखनकार्य
“प्रा. पन्हाळकर यांनी केवळ गणित शिकवले नाही, तर विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा दिली,” पन्हाळकर सरांनी गणित या विषयाबरोबर पर्यावरण या विषयाचे अध्यापन केले आहे.
पर्यावरण विषय शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग प्रेम लावून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक लेख वर्तमानपत्र प्रकाशित झालेले आहेत त्यापैकी काही मोजके लेख मार्कांचा महापूर, पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन, शाश्वत विकास ही काळाची गरज, व्यक्तिमत्व विकास, लॉकडाऊन नंतर गणित अध्यापन करताना येणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना अशा अनेक विषयाला अनुसरून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी स्वतःच्या घरी चिमण्यांसाठी घरटे व पाण्याची सोय केल्यामुळे गेली 18 वर्ष वर्षे त्यांच्या परिसरामध्ये चिमण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होऊन एक पर्यावरणाची साखळी समतोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एका मुलीवर नियोजन केले आहे. त्यांची कन्या प्रज्ञा पन्हाळकर ही देखील या महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ विभागात प्राध्यापिका म्हणून दोन वर्ष कार्यरत होती.

पुरस्कार आणि सामाजिक कार्य
त्यांच्या या सामाजिक कार्याचा विचार करून त्यांना पुणे येथील “महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक” म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांची कर्मभूमी सिंधुदुर्ग जिल्हा असला तरी त्यांनी आपली जन्मभूमी नेरले तालुका करमाळा येथे देखील अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच साप्ताहिक संदेश मधून त्यांचे अनेक वैचारिक लेख नेहमी प्रसिद्ध होत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून विज्ञान शाखेचे महत्त्व पटवून देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात.

निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांसाठी कार्याचा संकल्प
“विद्यार्थ्यांचे प्रेम संस्था व संस्थेतील पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेली सहकार्य आणि मार्गदर्शन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सहकारी प्राध्यापक यांचे सहकार्य यामुळेच मला सर्व क्षेत्रांमध्ये काम करताना कोणतीही अडचण आली नाही त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे.”

“सेवेतून निवृत्त झालो असलो तरी गणित या विषयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुढे देखील कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.”
तीन दशकांच्या समर्पित सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या या गणितगुरूंना सर्व सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!