अवकाळी पावसाने नुकसान, वीज कपातीने वाढल्या अडचणी; माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

करमाळा : करमाळा-माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदने दिली आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची तसेच उजनी धरण बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
१ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे करमाळा व माढा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब, द्राक्ष, पेरू व आंबा या फळबागांमधील झाडे उन्मळून पडली असून फुलोरा आणि लहान फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सध्या तीव्र उष्णतेच्या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिके जोपासली असताना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेल्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

उजनी बॅकवॉटर परिसरातील वीजप्रश्न ऐरणीवर
दरम्यान, दुसऱ्या निवेदनात उजनी धरण बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी त्याग करून धरण उभारणीसाठी योगदान दिले. या परिसरातील शेतीचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असून धरणातून पाणी उपलब्ध असतानाही वारंवार होणारी वीज कपात आणि सिंगल फेज वीजपुरवठा बंद केल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही.
वीजपुरवठा सुरळीत नसल्याने उभी पिके पाण्याअभावी जळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही संजयमामा शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

