सावडीत मानवतेला काळीमा- मानसिक रुग्णाला गेल्या अनेक वर्षापासून साखळीने बांधून ठेवले..

0
काल्पनिक चित्र..


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.५ : सावडी गावात मानवतेला हादरा देणारी धक्कादायक बाब समोर आली असून, एका मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला तब्बल १० ते १२ वर्षांपासून साखळीने बांधून ठेवण्यात आले आहे. योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने संबंधित व्यक्तीची मानसिक अवस्था अधिकच खालावली आहे.
याबाबत सुनील काळे यांनी पोलीसांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले,की संबंधित व्यक्तीला दीर्घकाळ एका ठिकाणी जखडून ठेवल्यामुळे त्याची दैनंदिन स्वच्छता व आरोग्याची योग्य काळजी घेतली जात नाही. शौच व मुत्र त्याच ठिकाणी आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण निर्माण होत असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच संबंधित व्यक्तीकडून वारंवार आरडाओरडा, शिवीगाळ तसेच नागरिकांना धमकावण्याचे प्रकार घडत आहे.


श्री.काळे यांनी प्रकाराची जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच मानवी हक्क आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित मानसिक रुग्णास तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, त्याची मानवीय पद्धतीने सुटका व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणात
प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सावडीसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना उपचार, समुपदेशन व पुनर्वसनाची गरज असते. अशा व्यक्तींना दीर्घकाळ साखळीने बांधून ठेवण्याच्या कृतीने या व्यक्ती दिवसेंदिवस आजार बळावत आहे.हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून मानवी हक्क, आरोग्य व्यवस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या संवेदनशीलतेचाही विषय बनला आहे. त्या व्यक्तीवर तात्काळ उपचार करावेत अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!