जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा व उद्यान एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी

0

करमाळा(दि. ८) : करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर–पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस (क्र. 12157/12158) तसेच मुंबई–बंगळुरू–मुंबई उद्यान एक्सप्रेस (क्र. 11301/11302) या रेल्वे गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (DRUCC) सदस्य प्रदीप एस. पवार यांनी केली आहे.

यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये जेऊर व परिसरातील हजारो प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा थांबा जेऊर स्थानकावर देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.



निवेदनात जेऊर रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

ही मागणी करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सादर करण्यात आली. जेऊर परिसरातील नागरिक व प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या दृष्टीने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!