जाधव पाटील रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू

0
संग्रहित छायाचित्र

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये “कै. डॉ. प्रदीप कुमार (आबा) जाधव पाटील कार्डियाक केअर युनिट अँड कॅथलॅब” ही अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ. रोहन जाधव-पाटील यांनी दिली. या सुविधेमुळे करमाळा व परिसरातील रुग्णांना हृदयरोगाच्या तपासण्या आणि उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असल्याचे ते म्हणाले.



याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर जाधव-पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच अन्य हृदयरोग निदान व उपचारांसाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बार्शी, अकलूज, बारामती आदी शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, आता या अत्याधुनिक सुविधा करमाळ्यातच उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या कार्डियाक केअर युनिटमुळे हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी उपचार देणे शक्य होणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वर्गीय डॉ. प्रदीप कुमार (आबा) जाधव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेली ही सुविधा ग्रामीण आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिटमुळे करमाळा तालुक्यात आधुनिक आरोग्यसेवेची नवी ओळख निर्माण होणार असून, हृदयरोग उपचार क्षेत्रात करमाळा अधिक सक्षम बनणार असल्याची माहिती डॉ. रोहन पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!