कर्तव्यनिष्ठ सेवेला राज्यस्तरीय गौरव : रुक्मिणी माने-सस्ते यांना “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” प्रदान

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शासन व प्रशासन क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीने सेवा बजावणाऱ्या जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक सौ. रुक्मिणी गणेश माने-सस्ते यांना “Be The Change Foundation” आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये “राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व सेवाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना गौरविण्यात आले. त्यामध्ये सौ. रुक्मिणी माने-सस्ते यांच्या कार्याची विशेष दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. माने-सस्ते यांनी आपल्या कार्यतत्परतेने, शिस्तबद्ध प्रशासनिक कामकाजाने आणि सेवाभावी वृत्तीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांशी समन्वय साधत जबाबदारीने केलेले काम आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.

रुक्मिणी माने या सहाय्यक कृषी अधिकारी गणेश माने यांच्या पत्नी असून, रामलिंग सस्ते (निवृत्त रेल्वे कर्मचारी) यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अरुण भंडारे, निवेदिता पगार, संजय वाबळे, शुभांगी थोरात, सर्जेराव मुंढे, अमृत रोहोम तसेच स्वप्नील आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे व सचिव रचना ढोकचौळे यांनी विशेष परिश्रम घेतले. रुक्मिणी माने-सस्ते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशासन, सामाजिक क्षेत्र तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

