शेततळ्याच्या संमतीवरून भावाकडून मारहाण-तिघांविरुद्ध गुन्हा दाखल -

शेततळ्याच्या संमतीवरून भावाकडून मारहाण-तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२८: शेततळे करण्यासाठी संमती पत्र मागितल्याच्या कारणावरून भावासह तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना करमाळा तालुक्यातील घोटी येथे घडल्याची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत दत्तात्रय रामचंद्र राऊत (वय ५५, रा. घोटी, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गट क्रमांक १३८ मधील जमीन ही त्यांच्यासह भाऊ विठ्ठल राऊत व नवनाथ राऊत यांच्या नावावर असून सुमारे दहा वर्षांपूर्वी वाटप झाले असले तरी शेतीचा अधिकृत विभाजन झालेले नाही.


फिर्यादीला शेततळे घ्यावयाचे असल्याने ते दिनांक १५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संमती पत्र घेण्याच्या उद्देशाने ते भाऊ विठ्ठल रामचंद्र राऊत यांच्या घरी गेले होते. यावेळी संमती पत्र देण्यास नकार देत वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवीगाळ करत हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, यावेळी उपस्थित असलेले चुलत भाऊ भारत प्रभाकर राऊत व भावजय चंद्रकला भारत राऊत यांनीही पकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विठ्ठल राऊत यांनी तेथे असलेली कुऱ्हाड घेऊन डोक्यात मारल्याने जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर जखमींना उपचारासाठी करमाळा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी विठ्ठल रामचंद्र राऊत, भारत प्रभाकर राऊत व चंद्रकला भारत राऊत (सर्व रा. घोटी, ता. करमाळा) यांच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!