जेऊर येथील 'लिटल एंजल' स्कूलच्या आवारात भरला 'सेंद्रिय आनंदी बाजार' - Saptahik Sandesh

जेऊर येथील ‘लिटल एंजल’ स्कूलच्या आवारात भरला ‘सेंद्रिय आनंदी बाजार’

जेऊर / संदेश प्रतिनिधी : जेऊर (ता करमाळा) येथील लिटल एंजल स्कूलच्या आवारात सेंद्रिय आनंदी बाजार भरवण्यात आला होता, या बाजारातील सेंद्रिय भाजीपाला फळे व धान्याला लोकांची मोठी मागणी झाली. या बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विषमुक्त शेती पिकवण्याचा संदेश नागरिकांना दिला.

येथील लिटल एंजल स्कूल व अटल ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या आवारात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय आनंदी बाजाराचे आयोजिन केले होते या बाजाराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक बबन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, या बाजारात रासायनिक खताचा वापर न करता पिकविलेल्या पालेभाज्या फळे व धान्याची विक्री विद्यार्थ्यांनी केली सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली केळी,जोडगव्हू,ऊस ,गुळ, काकवी फळे व भाजीपाला यांना मोठी मागणी होती.

तसेच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना विद्यार्थी रासायनिक खताच्या अतिरेक वापराचे दुष्परिणाम समजावून सांगत आरोग्यासाठी गरजेच्या सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देत होते. याशिवाय घरी बनवलेली लस्सी,थंडाई,केळी वेफर्स, पॉपकॉर्न याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. इतर ठिकाणाहून खरेदी करून आणलेल्या वस्तू विक्री पेक्षा स्वतःच्या शेतातील भाजीपाला आणि स्वतःच्या घरी बनवलेली वस्तू या बाजारात विक्री होत्या हे या बाजाराचे फार मोठे वैशिष्ट्य मानता येईल.

या बाजाराला व्यापारी संदीप कोठारी, परेशकुमार दोशी,साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग जाधव, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके,बालाजी गावडे, पत्रकार गजेंद्र पोळ,अशपाक सय्यद, वैभव पोळ,निलेश पाटील,उमेश पाथ्रुडकर, शहाजी राऊत, नितीन मेहता यांनी भेट दिल्या. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रसन्न बलदोटा, सुभाष इंगोले मुख्याध्यापिका शर्मिला फाटके रूक्मिणी साळूंके सर्वं शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!