कुस्तीपटू आश्लेषा बागडे ‘यशवंतश्री’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा(दि.१८)- येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी आश्लेषा बागडे हिने कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरती उतुंग यश संपादन केल्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने दिला जाणारा पहिला यशवंतश्री पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे यांच्या संकल्पनेतून या वर्षीपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यशवंत श्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र व 51 हजार रुपये असे आहे. हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे होते. या पुरस्काराचे वितरण श्री. घुमरे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मनोगतातून मा.विलासरावजी घुमरे सर यांनी आश्लेषा बागडे हिने महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर केलेले आहे.अशी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचे कौतुक केले. त्याचबरोबर येथून पुढे महाविद्यालयातील जे विद्यार्थी अशी उत्कृष्ट कामगिरी करतील अशा सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीमागे संस्था अगदी भक्कमपणे उभी राहील असे सांगितले.
यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. तात्यासाहेब मस्कर , संस्थेचे विश्वस्त श्री. चंद्रशेखर शीलवंत, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिल बदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. संभाजी किर्दाक, आश्लेषाचे आई -वडील,आप्तेष्ट,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान प्रमुख प्रा.विष्णु शिंदे यांनी केले तर आभार प्रा.एम.डी.जाधव यांनी मानले.





