दारूच्या वादातून भावाचा खून; बहिण व तिच्या पतीला अटक, करमाळा पोलिसांची २४ तासांत उकल -

दारूच्या वादातून भावाचा खून; बहिण व तिच्या पतीला अटक, करमाळा पोलिसांची २४ तासांत उकल

0

करमाळा (दि. १९): केम येथील मल्हारी पोपट कांबळे (वय ३८) यांच्या खुनाचा गुन्हा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत मृताची सख्खी बहीण शीतल राजू केंगार (वय ३०) व तिच्या पतीला राजेश बापू केंगार (वय ३२, दोघे रा. केम) यांना अटक केली आहे. दारूच्या व्यसनातून होत असलेल्या सततच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



१२ एप्रिल २०२६ रोजी केम गावातील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीच्या भरावाजवळील गंजीच्या आडोशाला मल्हारी कांबळे यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची नोंद सुरुवातीला करमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मृताच्या नातेवाईकांनीही त्यांना दारूचे व्यसन असल्याचे सांगून कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना कळवले होते.

मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाला वेग आला. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची चौकशी केली. यावेळी मृताची बहीण शीतल केंगार व तिचा पती राजेश केंगार यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता शीतल हिने गुन्ह्याची कबुली दिली.

शीतल हिने कबुलीत सांगितले की, तिचा भाऊ मल्हारी कांबळे हा दररोज दारू पिऊन घरी येत असे व तिच्यासोबत सतत भांडण करत असे. ‘तुम्ही येथून निघून जा’ असे सांगून त्रास देत असल्याने ती वैतागली होती. ११ एप्रिल रोजीही तो दारूच्या नशेत घरी आला व भांडण करू लागला. त्यावेळी राग अनावर झाल्याने शीतलने ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला.घटनेनंतर काही वेळातच तिचा पती राजेश केंगार घरी आला. शीतलने त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह खांद्यावर घेऊन गावाबाहेरील देवकर यांच्या शेतातील विहिरीजवळील गंजीच्या आडोशाला टाकून दिला, जेणेकरून मृत्यू अपघाती वाटावा असा त्यांचा प्रयत्न होता.

तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण व संशयितांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याची उकल केली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस कर्मचारी जाधव, अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, मनीष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित माने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!