मांगी येथे भवानी माता यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन

0

करमाळा (दि.१९) : तालुक्यातील मांगी येथे भवानी माता यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यंदाही पारंपरिक पद्धतीने यात्रा उत्साहात साजरी होत आहे. अक्षय तृतीया (आखिती) निमित्त रविवार, १९ एप्रिल रोजी यात्रेचा प्रारंभ झाला.



मांगी हे गाव माजी राज्य मंत्री कै. दिगंबरराव बागल व माजी सभापती कै. भागवतराव बागल यांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावाची यात्रा शिस्तबद्ध आयोजन, सामाजिक उपक्रम आणि सर्वधर्मसमभाव यांसाठी प्रसिद्ध आहे. यात्रेत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात येते तसेच आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते.


यात्रेनिमित्त भवानी मातेच्या पालखीची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे. हा आखाडा मांगी येथील नगर–करमाळा रस्त्यालगत असलेल्या स्वाभिमानी शक्ती स्थळ येथे भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुणे, अहिल्यानगर तसेच करमाळा तालुक्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत.


गावातील ज्येष्ठ कै. अण्णासाहेब बागल, कै. गोपाळभाऊ बागल व कै. मुरलीधर बागल यांनी घालून दिलेली परंपरा नव्या पिढीकडून जोमाने पुढे नेली जात आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कै. अण्णासाहेब बागल तालीम संघ, नवयुग मित्र मंडळ, भवानी माता यात्रा उत्सव समिती तसेच विठ्ठल-रुख्माई मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!