करमाळ्याच्या मातीत तयार झालेला; अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘मदार’ चित्रपट प्रदर्शित; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -

करमाळ्याच्या मातीत तयार झालेला; अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘मदार’ चित्रपट प्रदर्शित; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

करमाळा(प्रतिनिधी):करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मदार’ हा मराठी चित्रपट सध्या…

करमाळा(प्रतिनिधी):करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मदार’ हा मराठी चित्रपट सध्या करमाळा येथील छोटू महाराज सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून तालुक्यातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. २४ जुलैपासून सुरू झालेला हा चित्रपट दि. ३० जुलैपर्यंत छोटू महाराज सिनेमा टॉकीज येथे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाने २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ या पुरस्कारासह तब्बल पाच पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मंगेश बदर यांनी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिका पार पाडल्या आहेत.



‘मदार’ चित्रपटात अभिनेत्री अमृता अगरवाल यांच्यासह आदिनाथ जाधव, पांडुरंग राऊत, आजिनाथ केवडे आणि बलदोटा या कलाकारांनी भूमिका साकारल्या असून त्यातील काही कलाकार हे करमाळा तालुक्यातील घोटी गावचे आहेत. त्यामुळे या चित्रपटाला करमाळा तालुक्यातील प्रेक्षकांसाठी विशेष आपलेपणा निर्माण झाला आहे.

२०१९ मध्ये मंगेश बदर यांनी ‘मदार’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, पाण्यासाठी होणारी धावपळ आणि त्यातून माणसा-माणसांमध्ये निर्माण होणारे संघर्ष यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. विशेष म्हणजे ‘मदार’चे संपूर्ण चित्रीकरण करमाळा तालुक्यातील घोटी, करमाळा शहर आणि केम या ठिकाणी करण्यात आले आहे.

  • मदार’ चित्रपटाने मिळवलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत—
  • महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कार – ‘मदार’
  • अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – मंगेश बदर
  • अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार – अमृता अगरवाल
  • अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार – मिलिंद शिंदे
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट सिनेमाटोग्राफर पुरस्कार – आकाश बनकर व अजय बालेराव

करमाळा तालुक्याच्या मातीत चित्रित झालेल्या आणि स्थानिक कलाकारांच्या सहभागामुळे ‘मदार’ हा चित्रपट तालुक्यातील रसिकांसाठी अभिमानाचा विषय ठरत असून, चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मंगेश बदर यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!