भरधाव ट्रकची बुलेटला धडक; विवाहितेचा जागीच मृत्यू

0

केम(संजय जाधव): बार्शी–कुर्डूवाडी मार्गावरील रिधोरे गावाजवळ शुक्रवारी (दि. १७ जुलै) दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने गतिरोधक ओलांडताच टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती मच्छिंद्र जाधव (वय ४५, रा. केम, ता. करमाळा) या आपल्या मुलगा सोमेश्वर मच्छिंद्र जाधव (वय २५) याच्यासोबत रॉयल एनफिल्ड बुलेट (MH 45 AW 9190) या दुचाकीवरून केमहून बार्शी येथील अंधारे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या.

दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिधोरे गावातील न्यू इंग्लिश स्कूलसमोरील गतिरोधक ओलांडल्यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या टाटा ट्रक (MH 42 AR 7197) ने दुचाकीला जोरदार धडक दिली.

टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगात गतिरोधक ओलांडत असताना त्याचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूस गेला आणि समोरील बुलेटला जोरदार धडक बसली. या धडकेत आई व मुलगा रस्त्यावर फेकले गेले. सरस्वती जाधव या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर गणेश माने व अन्य नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना कुर्डूवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरस्वती जाधव यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी सोमेश्वर मच्छिंद्र जाधव यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी अमर लिमकर करीत आहेत.

केम गावावर शोककळा

अपघाताची बातमी केम गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!