घोटीतील मनोहर भोसले यांचा आश्रम कायमस्वरुपी बंद करण्यात यावा – घोटी ग्रामपंचायतकडून मागणी

केम(संजय जाधव): जादूटोणा व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या मनोहर मामा भोसले यांच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील आश्रमावर कारवाई करून तो तातडीने बंद करावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच विलास राऊत यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, मनोहर मामा भोसले यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून घोटी येथे आश्रम चालवला असून, दर पौर्णिमा व अमावस्येला येथे मोठ्या संख्येने लोक येतात. येणाऱ्या लोकांचे भविष्य सांगणे व जादूटोणा केल्याचे प्रकार येथे घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील, परराज्यातील विविध लोक आश्रमात येत असले, तरी स्थानिक नागरिक मात्र आश्रमापासून दूर राहतात, असेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, भोसले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात आल्याने, आश्रमावरही तत्काळ कारवाई करून तो कायमस्वरुपी बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. घोटी ग्रामपंचायतीने अवघ्या ४८ तासांत या प्रकरणात ठोस भूमिका घेतली असून, प्रशासन याची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी २०१२ साली करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे असलेला भोसले यांचा आश्रम गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या विरोधामुळे बंद करण्यात आला होता. त्याच धर्तीवर घोटी येथील सुमारे २७ एकरांवर पसरलेल्या आलिशान आश्रमावरही कारवाई होणार का, याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.


